पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या २० टक्के जागा वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:08 AM2021-02-10T04:08:31+5:302021-02-10T04:08:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा परीक्षा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा परीक्षा व प्रवेश शुल्कात वाढ होणार नाही. सोबतच संलग्नित महाविद्यालयांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये २० टक्के जागा वाढविण्यात येतील, असा निर्णय विद्वत्त परिषदेतर्फे घेण्यात आला. मंगळवारी विद्वत्त परिषदेच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीत महाविद्यालय व व्यवस्थापन परिषदेत मांडण्यात आलेल्या प्रस्तावांवर चर्चा झाली. यंदा पदवी परीक्षांचे निकाल चांगले लागले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या तुलनेत अभ्यासक्रमांत आवश्यक जागा नाहीत. त्यामुळे अनेक विद्यार्थी अद्यापही प्रवेशापासून वंचित आहेत. त्यामुळे महाविद्यालयांत २० टक्के अतिरिक्त जागा वाढविणे आवश्यक आहे, तरच सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकेल, असा प्रस्ताव होता. यावर सखोल चर्चा झाल्यावर त्याला मंजुरी देण्यात आली.
केवळ संलग्नित महाविद्यालयांतीलच जागा वाढतील. विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागांसाठी हा निर्णय लागू होणार नाही. जर विभागांमध्ये जागा वाढविल्या गेल्या तर तशा सुविधादेखील उपलब्ध करून द्याव्या लागतील. कमी कालावधीत ते शक्य नसल्याचे प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे यांनी स्पष्ट केले.