२० किलाे गांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:08 AM2021-03-28T04:08:52+5:302021-03-28T04:08:52+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क पारशिवनी : वेगात आलेली दुचाकी गतिराेधकावरून स्लीप झाली आणि त्यात दुचाकीचालक जखमी झाला. त्याचवेळी या दुचाकीच्या ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
पारशिवनी : वेगात आलेली दुचाकी गतिराेधकावरून स्लीप झाली आणि त्यात दुचाकीचालक जखमी झाला. त्याचवेळी या दुचाकीच्या डिक्कीतील पिशवी खाली पडली. त्या पिशवीत २० किलाे गांजा असल्याचे नंतर निष्पन्न झाल्याने पाेलिसांनी जखमी दुचाकीचालकास अटक केली आणि गांजासह दुचाकी जप्त केली. जप्त केलेल्या गांजाची एकूण किंमत दाेन लाख रुपये असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. ही कारवाई शनिवारी (दि. २७) सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.
ओंकारदास घनश्यामदास बैरागी (३३, रा. नरहरा, जिल्हा रायसेन, मध्य प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या जखमी आराेपीचे नाव आहे. ओंकारदास शनिवारी सायंकाळी विनाक्रमांकाच्या दुचाकीने आमडी फाट्याहून पारशिवनी शहराच्या दिशेने येत हाेता. याच मार्गावरील पारशिवनी शहरातील शिवाजी चाैकात असलेल्या गतिराेधकावर वेगात असलेली त्याची दुचाकी स्लीप झाली आणि ताे दुचाकीसह खाली काेसळल्याने जखमी झाला.
त्याचवेळी त्याच्या दुचाकीच्या डिक्कीतील पिशवी खाली पडली. मात्र, त्याकडे त्याचे लक्ष नव्हते. काही तरुणांना त्या पिशवीत गांजा असल्याची माहिती पाेलिसांना दिली. पाेलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून ताे गांजा जप्त केला. हा गांजा २० किलाे असून, त्याची एकूण किंमत दाेन लाख रुपये असल्याचे ठाणेदार संताेष वैरागडे यांनी सांगितले. त्यानंतर आराेपी ओंकारदासला अटक करून दुचाकीही जप्त करण्यात आली. याप्रकरणी पारशिवनी पाेलिसांनी गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप उबाळे, मुद्दस्सर जमाल, रोशन काळे, कौशिक अन्सारी करीत आहेत.
...
मध्य प्रदेशातून तस्करी
पाेलिसांनी या कारवाईमध्ये जप्त केलेल्या गांजाची किंमत १० हजार रुपये प्रति किलाे आकारली आहे. वास्तवात, पारशिवनी तालुक्यात गांजाची चाेरून लपून माेठ्या प्रमाणात विक्री केली जात असून, गांजाची एक पुडी किमान ३०० रुपयाला विकली जाते. त्या पुडीत पाच ते सात ग्रॅम गांजा असताे. त्यामुळे या गांजाची किंमत किमान ३० हजार रुपये प्रति किलाे असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवाय, हा गांजा मध्य प्रदेशातून पारशिवनी तालुक्यात आणला जाताे.