अमरावती परिक्षेत्रात खुनाच्या २० गुन्ह्यांमधील मारेकरी मोकळेच !
By admin | Published: May 30, 2017 05:30 PM2017-05-30T17:30:59+5:302017-05-30T17:30:59+5:30
खुनाच्या एक-दोन नव्हे तर तब्बल २० गुन्ह्यांमधील मारेकरी शोधण्यात अमरावती परिक्षेत्रीय पोलिसांना गेल्या दोन वर्षांपासून यश आलेले नाही.
राजेश निस्ताने ।
यवतमाळ : खुनाच्या एक-दोन नव्हे तर तब्बल २० गुन्ह्यांमधील मारेकरी शोधण्यात अमरावती परिक्षेत्रीय पोलिसांना गेल्या दोन वर्षांपासून यश आलेले नाही. या ‘अनडिटेक्ट’ (उघडकीस न आलेल्या) गुन्ह्यांबाबत थेट राज्याच्या पोलीस महासंचालकांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
पोलीस महासंचालक सतीश माथूर, अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) बिपीन बिहारी, अपर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) एस. जगन्नाथन जूनच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यातील उघडकीस न आलेल्या गंभीर गुन्ह्यांच्या तपासाच्या स्थितीचा आढावा घेणार आहे. त्या अनुषंगाने राज्यभरातील पोलीस यंत्रणा ‘अनडिटेक्ट’ गुन्ह्यांचा लेखाजोखा जुळविण्यात व्यस्त आहे.
खुनी नेमका कोण? रहस्य कायम
एकट्या अमरावती परिक्षेत्रामध्ये खुनाचे तब्बल २० गुन्हे अद्याप उघडकीस आलेले नाही. त्यातील अज्ञात आरोपी खून करून अद्यापही मोकाट आहेत. खुनाचा तपास झाला, मात्र पोलिसांना सुगावा लागलेला नाही. पर्यायाने खुनी नेमका कोण ? ही बाब गुलदस्त्यात आहे. आता तर खुनाचे हे २० गुन्हे ‘अनडिटेक्ट’च्या यादीत गेल्याने त्यांच्या तपासाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. सन २०१५ मध्ये बुलडाणा व अमरावती ग्रामीण येथे दरोड्याचा प्रत्येकी एक, सन २०१६ मध्ये अकोला येथे खुनाच्या प्रयत्नाचा एक व बुलडाणा व अमरावती ग्रामीणमध्ये दरोड्याचा प्रत्येकी एक गुन्हा उघडकीस आलेला नाही.
खुनाचा प्रयत्न, दरोड्याचेही गुन्हे प्रलंबित
४सन २०१५ मध्ये अमरावती ग्रामीण, बुलडाणा व यवतमाळातील प्रत्येकी दोन, तर अकोला व वाशिम येथील खुनाच्या प्रत्येकी एक गुन्ह्याचा ‘अनडिटेक्ट’च्या यादीत समावेश आहे.
४सन २०१५ मध्ये आठ गुन्ह्यांचा सुगावा लागला नसताना सन २०१६ मध्ये त्यात आणखी १२ ‘अनडिटेक्ट’ गुन्ह्यांची भर पडली. त्यात सर्वाधिक सात गुन्हे बुलडाणा जिल्ह्यातील आहेत. वाशिम व अमरावती ग्रामीणचे दोन तर अकोल्याचा एक गुन्हा आहे.
४खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा या ‘अनडिटेक्ट’ गुन्ह्यातील तपास अधिकाऱ्यांना महासंचालकांच्या आढावा बैठकीत प्रत्यक्ष पाचारण केले जाणार आहे.
४स्थानिक गुन्हे शाखेसारख्या महत्वाच्या बँ्रचकडे यातील अनेक गुन्ह्यांचा तपास सोपवूनही त्याचा अद्याप छडा लागलेला नाही, हे विशेष!