वन्यप्राणी हल्ल्यातील प्राणहानीसाठी आता २० लाख रुपये भरपाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2022 07:48 PM2022-08-24T19:48:18+5:302022-08-24T19:48:53+5:30
Nagpur News वन्यप्राण्याच्या हल्ल्यात व्यक्तीचा मृत्यू झाल्यास यापुढे २० लक्ष रुपये तर गाय, बैल, म्हैस या जनावरांचा मृत्यू झाल्यास ७० हजार रुपये भरपाई मिळेल.
नागपूर : वाघ, बिबट, अस्वल, रानडुक्कर, लांडगा, तरस, काेल्हा, मगर, हत्ती व रानकुत्रे यांच्या हल्ल्यात मनुष्य हानी तसेच पशुधनाचा मृत्यू किंवा जखमी झाल्यास मिळणाऱ्या नुकसान भरपाई मध्ये वाढ करण्यात आली आहे. यानुसार वन्यप्राण्याच्या हल्ल्यात व्यक्तीचा मृत्यू झाल्यास यापुढे २० लक्ष रुपये तर गाय, बैल, म्हैस या जनावरांचा मृत्यू झाल्यास ७० हजार रुपये भरपाई मिळेल.
विविध कालावधीत झालेल्या शासन निर्देशानुसार वन्यप्राणी हल्ल्यात मनुष्य हानी किंवा अपंगत्व आल्यास तसेच पशुधनाची हानी झाल्यास नुकसान भरपाई मिळते. मात्र हे अर्थसहाय्य कमी असल्याने त्यात वाढ करण्याची मागणी सातत्याने केली जात हाेती. त्यानुसार राज्य शासनाच्या वने व महसूल विभागातर्फे नुकसान भरपाईत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. वन्यप्राण्याच्या हल्ल्यात व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना २० लक्ष रुपये देण्यात येतील. यातील १० लक्ष रुपयाचा धनादेश व उर्वरित १० लक्ष रुपये संबंधितांच्या खात्यात फिक्स डिपाॅझिट करण्यात येतील. हल्ल्यात व्यक्ती कायमस्वरुपी अपंग झाल्यास ५ लक्ष रुपये, गंभीर जखमी झाल्यास १.२५ लाख रुपये तर किरकाेळ जखमी झाल्यास औषधाेपचारासाठी २० हजार रुपये अर्थसहाय्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
गाय,म्हैस व बैल यांचा प्राणी हल्ल्यात मृत्यू झाल्यास बाजारभावाच्या किमतीच्या ७५ टक्के किवा ७० हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात येईल. या जनावरांना कायम अपंगत्व आल्यास बाजारभाव किंमतीच्या ५० टक्के किंवा १५ हजार रुपये मिळतील. गाय, म्हैस, बकरी, बैल, मेंढी व इतर पशुधन जखमी झाल्यास बाजारभाव किंमतीच्या २५ टक्के किंवा ५००० रुपये प्रती जनावर भरपाई देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अटी व शर्थी पूर्वीच्या निर्णयाप्रमाणे कायम राहणार असल्याचे नव्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.