'सोलर इंडस्ट्रीज'च्या स्फोटातील मृतांच्या कुटुंबीयांना २० लाखांची आर्थिक मदत
By नरेश डोंगरे | Published: December 20, 2023 09:42 PM2023-12-20T21:42:34+5:302023-12-20T21:43:01+5:30
कुटुंबातील एकाला नोकरी तर कुटुंबप्रमुखाला आजीवन पेन्शन; कंपनी व्यवस्थापनाची घोषणा
नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, कोंढाळी / नागपूर: अमरावती मार्गावरील सोलर एक्सप्लोसिव्ह मध्ये झालेल्या भीषण स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना कंपनी प्रशासनाकडून आज प्रत्येकी २० लाख रुपयांची मदत देण्यात आली. कुटंब प्रमुखाला आजीवन पेंशन आणि कुटुंबातील एकाला नोकरी देण्याचे आश्वासनही यावेळी कंपनीतर्फे देण्यात आले.
अमरावती मार्गावरील बाजारगाव नजिकच्या चाकडोह येथील सोलर एक्सप्लोसिव्ह इंडस्ट्रीजमध्ये रविवारी, १७ डिसेंबरला भीषण स्फोट झाला होता. या स्फोटात सहा महिला आणि ३ पुरूष अशा एकूण ९ जणांचा करुण अंत झाला. स्फोटाच्या घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट दिली. त्यांनी मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन करून नागरिकांच्या भावना ऐकून घेतल्या. त्यावेळी शासनाकडून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाखांची आर्थिक मदतही जाहिर करण्यात आली होती.
दरम्यान, या घटनेला आता चार दिवस झाले असून, सोलरच्या स्फोटाचा विषय विधीमंडळ सभागृहात आणि दिल्लीपर्यंत पोहचला आहे. जणमानसातही तीव्र संतापाची भावना आहे. ती लक्षात घेऊन सोलर इंडस्ट्रीजच्या व्यवस्थापनाकडून आज बुधवारी मृतकाच्या कुटुंबियांना प्रत्येकी २० लाखांचा धनादेश देण्यात आला. त्यांचे सांत्वन करून मृतकाच्या कुटुंबप्रमुखाला आजनीवन पेंशन आणि कुटुंबातील एकाला नोकरी देण्याचे आश्वासनही यावेळी कंपनीचे व्यवस्थापक सोमेश्वर मुंधडा आणि एम. के. सिंग यांनी दिले.