२० हजार नागरिकांची एकाच वेळी योग साधना
By admin | Published: June 20, 2017 02:10 AM2017-06-20T02:10:38+5:302017-06-20T02:10:38+5:30
विश्व योगदिनानिमित्त महापालिके तर्फे योगाचा प्रचार व प्रसार करणाऱ्या विविध १२ संस्थांच्या सहकार्याने धंतोली येथील यशवंत स्टेडियमवर २१ जूनला बुधवारी सकाळी ५.४५ वाजता कार्यक्रमाचे आयोजन....
विश्व योगदिनाची तयारी : मनपाला १२ संस्थांचे सहकार्य
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विश्व योगदिनानिमित्त महापालिके तर्फे योगाचा प्रचार व प्रसार करणाऱ्या विविध १२ संस्थांच्या सहकार्याने धंतोली येथील यशवंत स्टेडियमवर २१ जूनला बुधवारी सकाळी ५.४५ वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात नागपूर शहरातील २० हजार नागरिक सहभागी होणार असल्याची माहिती महापौर नंदा जिचकार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
सकाळी ६.१५ ते ८.१५ असे दोन तास कार्यक्रम होईल. यात एक तास योग करण्यात येतील. पावसाची शक्यता असल्याने उभ्याने शक्य असलेल्या योगाचा समावेश करण्यात आला आहे. कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी तर विशेष अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहतील. शहरातील सर्व आमदार, खासदार व नगरसेवकांना निमंत्रित करण्यात आले आहे. योगप्रेमींनी कार्यक्रमाला शुभ्र रंगाचे कपडे परिधान करून सहभागी व्हावे, असे आवाहन नंदा जिचकार यांनी केले. पतंजली या कार्यक्रमात सहभागी होणार नाही. त्यांची योग साधना वेगळी असल्याने त्यानुसार स्वतंत्र कार्यक्रम आयोजित केला असल्याची माहिती त्यांनी दिली.
कार्यक्रमात जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ, आर्ट आॅफ लिव्हिंग, गायत्री परिवार, मैत्री परिवार संस्था, क्रीडा भारती, ब्रह्मकुमारीज, नागपूर जिल्हा योग संघटना, रामकृष्ण मिशन, श्रीयोग साधना केंद्र, सहजयोग ध्यान केंद्र, एन.सी.सी. जिल्हा क्रीडा असोसिएशन व ईशा फाऊंडेशन आदी संस्थांचा सहभाग राहणार आहे. पत्रपरिषदेला उपमहापौर दीपराज पार्डीकर, सत्तापक्षनेते संदीप जोशी, माजी महापौर प्रवीण दटके,आयुक्त अश्विन मुद्गल, सभापती अविनाश ठाकरे, नागेश सहारे, दिलीप दिवे आदी उपस्थित होते.
नागरिकांसाठी
बस सुविधा
योगदिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या नागरिकांसाठी बसेसची व्यवस्था केली जाणार आहे. नागरिकांना सशुल्क या सेवेचा लाभ घेता येईल. पन्नासे ले-आऊ ट ते बर्डी, जयताळा-बर्डी, बेलतरोडी ते बर्डी, सोमलवाडा शाळा, टेलिकॉम नगर, प्रतापनगर, माधवनगर-बर्डी, जयप्रकाश नगर ते बर्डीमार्गे खामला, छत्रपती चौक, सोनेगाव, बर्डी, जरीपटका ते बर्डी, पारडी ते बर्डी, गांधीबाग उद्यान ते बर्डी, दिघोरी ते बर्डी, रमणा मारोती ते बर्डी, काटोल नाका ते साई मंदिर आदी मार्गावर ही सुविधा राहील.