२० वर्षात नागपूरचे १० तलाव अतिक्रमणाने गिळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:11 AM2021-08-28T04:11:23+5:302021-08-28T04:11:23+5:30
निशांत वानखेडे नागपूर : नैसर्गिक संपत्तीच्या संवर्धनाबाबत आपण इतके बेजबाबदारपणे वागताे की हळूहळू एक एक वारसा गमावला आहे. बिल्डर ...
निशांत वानखेडे
नागपूर : नैसर्गिक संपत्तीच्या संवर्धनाबाबत आपण इतके बेजबाबदारपणे वागताे की हळूहळू एक एक वारसा गमावला आहे. बिल्डर लाॅबी व अतिक्रमणकारांनी जंगले, नद्या, तलाव घशात घातल्या आहेत आणि सरकार, सत्ताधारी, जबाबदार प्रशासन मूकपणे त्याला प्राेत्साहन देत अतिक्रमणाची मलाई खाण्यात मस्त आहेत. सामान्य माणसांना तर काही देणेघेणेच राहिले नाही. गेल्या २० वर्षात नागपुरातील १०-१२ तलाव अतिक्रमणाने अक्षरश: गिळंकृत केले आहेत. विश्वास बसत नाही ना, पुरावा हवा आहे ना, तर मग ‘गुगल मॅप’वर जा. २००० साली नागपूरच्या स्थितीचे बारकाईने अवलाेकन करा. नंतर कॅलेंडरचे वर्ष बदलवून २०१९-२० वर घेऊन या आणि निरीक्षण करा. तुमच्या शहरात, कदाचित शेजारी असलेले काही गायब झाल्याचे दिसेल.
एका पर्यावरणप्रेमीच्या मदतीने केलेल्या सर्वेक्षणातून आम्ही २० वर्षात बदललेली सत्यपरिस्थिती आपणासमाेर मांडताे आहाेत.
१) वाडी परिसरात २००० साली चार तलाव जवळजवळ हाेते. त्यातील एक तलाव एका माेठ्या बिल्डर कंपनीने पूर्ण बुजविले आणि वसाहत वसविली. दुसरा तलाव गाेडाऊनच्या अतिक्रमणात गायब झाला. उरलेले जवळचे दाेन तलाव वस्त्या वसल्याने एका तलावात रुपांतरीत झाले. या तलावांमधून अंबाझरीपर्यंत वाहणारे प्रवाहसुद्धा सुकले, नष्ट झाले.
२) हिंगणा राेड एरियात २००२ साली एअरपाेर्टजवळ एक व एमआयडीसी परिसरात दाेन तलाव तलाव स्पष्ट दिसतात. २०१९ च्या नकाशातून ते गायब झाले. विमानतळाजवळ मेट्राे यार्ड आहे तर एमआयडीसीचे तलाव निवासी वसाहतीत रुपांतर झाले.
३) २००० मध्ये अतिक्रमण नसल्याने विस्तारित असलेला साेनेगाव तलाव २०१९ मध्ये संकुचित झाला. मनीषनगर, बेसा भागात वेडावाकडा असलेला नदीचा प्रवाह अतिक्रमणाने सरळ करून टाकला.
४) रहाटे काॅलनी ते कारागृह भागात २००२ मध्ये दिसणारे लहान तलाव २०२० मध्ये नामशेष झाले.
५) पूर्व नागपूर, पारडी परिसरातून झिकझॅक असलेला नाग नदीचा प्रवाह अतिक्रमणामुळे सुतासारखा सरळ झाला.
६) काेराडी भागात २००३ मध्ये दिसणारे ३ तलाव वीज निर्मिती केंद्राच्या राखेने डबक्यात रुपांतरीत झाले.
७) इतवारीच्या परिसरातही २००० सालच्या नकाशात ३ तलाव तुम्हाला दिसतील. आता यातले दाेन तलाव तुम्ही दाखवून द्या.
८) शुक्रवारी तलावाजवळ २००० साली एक तलाव हाेता. आता त्यावर वसाहत वसली. फ्रेन्ड्स काॅलनी एरिया व नागपूरच्या बाह्यभागातूनही काही वाॅटर बाॅडिज नामशेष झाल्यात.
काेणत्याही गाेष्टीकडे दुर्लक्ष करण्याच्या सामान्यांच्या प्रवृत्तीमुळे नैसर्गिक संपत्तीची सर्रास लूट चालली आहे. या संपत्तीला पैसा कमाविण्याचे माध्यम मानणाऱ्या प्रवृत्तींच्या संगनमताने वारसा संपविला गेला. या साऱ्याचे भयंकर परिणाम भविष्याच्या पिढीला भाेगावे लागतील. निसर्ग, पर्यावरण या साऱ्याचा वचपा काढेल.
- प्राची माहुरकर, पर्यावरण अभ्यासक