बोगस ट्रेडिंग ॲपच्या माध्यमातून तब्बल २०० कोटींची फसवणूक; १५ मो. नंबर, ७० बँक खात्यांची चौकशी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 12:13 PM2023-03-20T12:13:15+5:302023-03-20T12:15:19+5:30
: आर्थिक शाखा करतेय तपास
नागपूर : बोगस ट्रेडिंग ॲपच्या माध्यमातून शेअर बाजार व क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून टोळीने २०० कोटींपेक्षा जास्त रुपयांनी गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे. या टोळीने व्यवहार करताना वापरलेल्या एका बँकेच्या खात्यातून झालेल्या व्यवहारावरून याप्रकरणी संशय अधिक दाटला आहे. प्रकरणाचा तपास करीत असलेल्या आर्थिक गुन्हे शाखेने शनिवारी एका बँक खात्यात जमा असलेले १० हजार रुपये गोठविले.
या टोळीमुळे पीडित असलेल्या गुंतवणूकदारांना पैसे मिळणे बंद झाल्याने त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार दाखल केली होती. त्या आधारे १७ मार्च रोजी आर्थिक शाखेने फसवणूक, एमपीआयडी व गुन्हेगारी षडयंत्र रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली होती. ही टोळीने डब्ल्यूएमटी व्हॉट्सॲप व टेलिग्रामच्या माध्यमातून लिंक शेअर करून गुंतवणूकदार मिळविले होते. पोलिसांना सुरुवातीला ६० गुंतवणूकदारांची ३० लाखांनी फसवणूक झाल्याची माहिती मिळाली होती. यासंदर्भात सविस्तर चौकशी केल्यावर पोलिसांना देशातील अनेक राज्यात अशाच प्रकारची फसवणूक झाल्याची माहिती मिळाली होती.
पीडित गुंतवणूकदार व टोळीच्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे पोलिसांना काही बँक खात्याची माहिती मिळाली. या खात्यावर देशभरातून पैसा जमा झाला होता. आरोपींनी बहुतांश रक्कम तत्काळ काढली होती. नागपूर बरोबरच इतर राज्यांतील गुंतवणूकदारही फसवणुकीची तक्रार घेऊन पोलिसांकडे पोहोचले होते. या तक्रारीच्या आधारे दुसऱ्या राज्याच्या पोलिसांनी आरोपींचे बँक खाते गोठविले आहे.
गुन्हे शाखेला एका खात्यातून एक कोटी रक्कम पहिलीच गोठविण्यात आल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांच्या तपासात एक बँक खाते आढळले आहे. ज्यात किमान २०० कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचा संशय आहे. या खात्याची सविस्तर चौकशी केल्यानंतरच पोलिसांना निश्चित दिशा मिळू शकेल. आर्थिक गुन्हे शाखेला केवळ एका बँक खात्यात १० हजार रुपये मिळाले आहेत. त्या खात्याला गोठविण्यात आले आहे.
- ६० ते ७० बँक खात्याचा वापर
सूत्रांच्या माहितीनुसार, टोळी १२ ते १५ मोबाइल नंबरच्या आधारे ६० ते ७० बँक खात्याच्या माध्यमातून व्यवहार करीत होती. सर्वच नंबर आभासी व दुसऱ्या देशातील आहे. या क्रमांकाच्या माध्यमातून ही टोळी व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम व दुसऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ऑपरेट केली जात होती. फसवणुकीत वापरण्यात आलेले मोबाइल नंबर दुसऱ्या देशातील असल्याने माहिती मिळण्यास विलंब होत आहे. त्याच कारणाने पोलिसांचा तपास थांबला आहे.
मोबाइल नंबरच्या आधारावर या टोळीचे सूत्रधार बाहेरील राज्यातील असल्याची माहिती आहे. आर्थिक गुन्हे शाखा याप्रकरणीच गंभीरतेने सखोल चौकशी करीत आहे. पोलिसांना तपासात आश्चर्यकारक माहिती मिळू शकते. या फसवणुकीत नागपुरातील लोकांची संख्या जास्त आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे डीसीपी अर्चित चांडक यांनी पीडित गुंतवणूकदारांना तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले आहे.