मुसळधार पावसामुळे एस.टी.च्या २०० फेऱ्या रद्द; हजारो प्रवासी हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2022 09:06 PM2022-07-14T21:06:10+5:302022-07-14T21:06:40+5:30
Nagpur News एस.टी. महामंडळाने नागपूर विभागाच्या विविध मार्गांवरील सुमारे २०० फेऱ्या रद्द केल्या आहेत. परिणामी ग्रामीण भागातील एस.टी.ची वाहतूक व्यवस्था कोलमडल्यासारखी झाली आहे.
नागपूर : तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जागोजागचे नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे वाहतुकीला अडसर निर्माण झाला असून धोका लक्षात घेता, एस.टी. महामंडळाने नागपूर विभागाच्या विविध मार्गांवरील सुमारे २०० फेऱ्या रद्द केल्या आहेत. परिणामी ग्रामीण भागातील एस.टी.ची वाहतूक व्यवस्था कोलमडल्यासारखी झाली आहे.
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस थांबायला तयार नाही. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी साचले आहे. महामार्गाला जोडून असलेल्या शहरी भागातील वाहतूक सुरळीत असली तरी ग्रामीण भागातील नद्या-नाले तुडुंब भरले असून गावोगावचे पूल, रपट्यातील पाणीही धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे. त्यामुळे प्रवाशांची ने-आण करणे धोक्याचे ठरले आहे. ते लक्षात घेता एस.टी.ने नागपूर विभागातील १६२० पैकी २०० वर फेऱ्या रद्द केल्या आहेत. अधिकाऱ्यांच्या मते नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी बस सुरू आहे. मात्र, अनेक जिल्ह्यांतील ग्रामीण भागांत पुराचा धोका असल्याने ग्रामीण भागातील फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, बस रद्द झाल्याने ठिकठिकाणच्या हजारो प्रवाशांची तीव्र कोंडी झाली आहे. गावात पाहुणे म्हणून आलेल्यांना आणि गावातून बाहेर गेलेल्यांना आपल्या गावी परतण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे.
बसस्थानकांवर प्रचंड गर्दी
अनेक ठिकाणच्या बसगाड्या पावसामुळे विलंबाने पोहोचत आहेत; तर ज्या गावाला जायचे, त्या मार्गावरील नदी, नाल्यांच्या पावसाचा अंदाज घेऊन बस सोडण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतल्याने आणि अनेक ठिकाणच्या फेऱ्या रद्द केल्याने त्या गावाला जाण्यासाठी आलेल्या प्रवाशांची बसस्थानकांवर प्रचंड गर्दी झाली आहे. जेथे जायचे आहे, त्या गावची बस कधी लागेल, त्याची निश्चिती नसल्याने अधिकाऱ्यांकडूनही व्यवस्थित माहिती मिळत नाही. त्यामुळे अनेक प्रवासी तासनतास बसस्थानकावर ताटकळत आहेत.
काय माहीत बापा... कधी येईन त एसटी
आवश्यक कामानिमित्त नागपुरात आलेल्या आणि आता ज्या गावाला जायचे आहे, तेथे बस उपलब्ध नसल्याने स्थानकावर ताटकळत असलेल्या प्रवाशांपैकी काहींसोबत ‘लोकमत’ने चर्चा केली. त्यांची प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे आहे.
१) महादेव दाऊत्रे (रा. तूर कुही)
१४ मैलला जायचे आहे. दीड ते दोन तासांपासून वाट बघतो आहे बसची. कधी येईल माहीत नाही. कुणी व्यवस्थित सांगतही नाही.
२) लक्ष्मीबाई जीवराहे (रा. पेंच नवेगाव, खैरी)
कोंढाळीजवळच्या दुधाळ्याला जायचे आहे. ११ वाजता आली. आता २ वाजत आले. अजून किती वेळ लागन, माहीत नाही.
३) रशीदभाई शेख (रा. नागपूर)
चांदूर बाजारला जायचे आहे. १२ च्या सुमारास येथे आले. ३ वाजता गाडी लागेल म्हणतात. काही खरं नाही, असंही म्हणतात. महत्त्वाचे काम आहे. जाणे आवश्यक आहे. काय करू समजत नाही.
४) पुष्पाबाई येवले (रा. वणी)
वणीला जायचे आहेजी. दोन-अडीच घंटे झाले. कधी बस लागंन ते कुणी सांगतच नाही. जीव सारा वैतागून गेला.
५) गजानन काळबांडे (रा. नागपूर)
रंगारी (मध्यप्रदेश) येथे जायचे आहे. एक वाजता आलो. आता लागन, आता लागन, बस असंच सांगताहे. कंटाळून गेलो. आता म्हणते तीन वाजता बस आहे म्हणून. बघतो आता.
प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य आहे. ज्या मार्गावर धोका आहे, अशाच ठिकाणी बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या. पाण्याचा धोका नसलेल्या ठिकाणी बस सुरू आहे. पुराचा धोका टळताच बसफेरी सुरू करण्यात येईल.
-गजानन नागुलवार
विभागीय नियंत्रक, एस.टी. महामंडळ, नागपूर
----