नागपुरातील कस्तुरचंद पार्कवर सापडल्या २०० वर्षे जुन्या ४ तोफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 05:20 PM2019-10-17T17:20:22+5:302019-10-17T17:33:32+5:30
ऐतिहासिक वारसा असलेल्या कस्तुरचंद पार्कमध्ये चार पुरातन युद्ध तोफा बुधवारी रात्री आढळून आल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ऐतिहासिक वारसा असलेल्या कस्तुरचंद पार्कमध्ये चार पुरातन युद्ध तोफा बुधवारी रात्री आढळून आल्या. मैदानावर सौंदर्यीकरणासाठी सुरू असलेल्या खोदकामादरम्यान चारही तोफा सापडल्या. या तोफा २०० वर्षे जुन्या असून भोसले व इंग्रजांमध्ये झालेल्या लढाईदरम्यान भोसल्यांकडून या तोफा वापरण्यात आल्याचा दावा केला जात आहे. शिवाय मैदानात आणखी दारूगोळा सापडण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
ऐतिहासिक कस्तुरचंद पार्कवर सध्या वॉकिंग ट्रॅक निर्मिती व वृक्षारोपणासह सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. याअंतर्गत पार्कवर खोदकाम सुरू आहे. बुधवारी रात्री मैदानात उभी असलेल्या वास्तुजवळ काम सुरू असताना अचानक या चारही तोफा आढळल्या.. सोबत तोफा ठेवण्यासाठी उपयोगात येणारे दोन स्टॅँडही होते. याबाबत पुरातत्व विभाग, महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालयाला सुचना करून त्या बाजुला काढून ठेवल्याची माहिती सौंदर्यीकरण कामाचे आर्किटेक्ट व हेरिटेज समितीचे सदस्य अशोक मोखा यांनी दिली. गुरुवारी या तोफा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी मैदानावर जमली होती. याबाबत मोठी उत्सुकता लोकांमध्ये दिसून येत होती.
यातील दोन तोफा दहा फुट आणि दोन साडे नउ फुटांच्या असून यांचे वजन जवळपास १००० किलोग्रॅमच्यावर असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या तोफा येथे कशा आल्या संशोधनाचा विषय आहे. साधारणत: २०० वर्षापूर्वी राजे रघुजी भोसले व इंग्रजांमध्ये झालेल्या ऐतिहासिक सीताबर्डी युद्धादरम्यान या तोफा वापरण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. या तोफा लांब पल्ल्याच्या असल्याने ब्रिटीशांच्या इस्ट इंडिया कंपनीकडून बनविण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र कुणाकडून वापरण्यात आल्या, याबाबत संभ्रम आहे. ब्रिटीशांनी युद्धात या तोफा वापरल्याचा दावा केला जात आहे. मात्र नागपूरचे इतिहासतज्ज्ञ भा. रा. अंधारे यांच्यानुसार भोसल्यांनी इस्ट इंडिया कंपनीकडून या तोफा विकत घेतल्या होत्या व त्यांनीच त्या युद्धात वापरल्याचा दावा त्यांनी केला.
दरम्यान सैन्यदलाने या चारही तोफा ताब्यात घेत सीताबर्डी किल्ल्यामध्ये नेल्या. पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तोफांची पाहणी केली असून सविस्तर संशोधन करून त्या किती वर्षे जुन्या आहेत, कधी आणि कुठल्या तोफखान्यात बनविण्यात आल्या, याबाबत माहिती काढली जाणार असल्याचे सांगितले आहे