अन् २०० वर्षांच्या वृक्षाला मिळाले ‘जीवनदान’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 02:02 AM2017-08-18T02:02:03+5:302017-08-18T02:02:25+5:30
गेल्या २०० वर्षांपासून ऊन,पाऊस, वारा झेलत उभ्या असलेल्या पिंपळाच्या झाडाचा गुरुवार हा अखेरचा दिवस ठरला असता.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या २०० वर्षांपासून ऊन,पाऊस, वारा झेलत उभ्या असलेल्या पिंपळाच्या झाडाचा गुरुवार हा अखेरचा दिवस ठरला असता. एरवी मोठमोठाल्या प्रकरणांकडे दुर्लक्ष करणाºया मनपा प्रशासनाने केवळ एका तक्रारीवरुन वृक्ष कापण्याची परवानगी दिली अन् वृक्षाची ‘कत्तल’ करण्यासाठी मोठमोठाली यंत्र आणण्यात आली. मात्र परिसरातील नागरिकांनी पुढाकार घेतला अन् या वृक्षाला जीवनदान मिळाले.
सीताबर्डी येथील बुटीवाडा, भिडे रोड, टेम्पल बाजार येथील २०० वर्षे जुने पिंपळाचा वृक्ष आहे. घनश्याम पुरोहित नावाच्या व्यक्तीने, या वृक्षामुळे धोका उद्भवू शकतो, या आशयाचे पत्र मनपाच्या उद्यान विभागाला देऊन, वृक्ष कापण्यासंदर्भात परवानगी मागितली होती. मनपाच्या उद्यान विभागाने परवानगी दिली मात्र त्यात फक्त धोकादायक ठरलेल्या फांद्याच कापाव्यात, असे स्पष्ट केले.
परंतु गुरुवारी दुपारच्या सुमारास वृक्ष कापण्यासाठी मोठमोठी यंत्र सामुग्री घेऊन काही लोक पोहचले. परिसरातील लोकांनी यापूर्वी हे वृक्षा कापण्यात येऊ नये, असे पत्र मनपाला दिले होते. लोकांनी वृक्ष कापण्यासाठी त्यांना विरोध केला. यावेळी सीताबर्डी ठाण्याचे पथकही तेथे पोहचले. वृक्ष संवर्धनासाठी काम करणारे ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनचे कौस्तुभ चॅटर्जी व त्यांचे सहकारीसुद्धा परिसरात पोहचले. सर्वांनीच ही कारवाई थांबवावी, यासाठी प्रयत्न केला. मनपाचे उद्यान निरीक्षक अमोल चौरीपगार यांना घटनास्थळी बोलविण्यात आले. त्यांनी परवानगीचे पत्र बघितल्यावर, ही कारवाई ताबडतोब थांबवायला लावली. या कारवाईमुळे अतिशय जुना वृक्ष कापण्यापासून वाचले. जी फांदी धोकादायक ठरते आहे. तीच कापण्यात यावी आणि तेही मनपा अधिकाºयांच्या उपस्थितीत असे निर्देश देण्यात आले. ही कारवाई थांबविण्यात आल्यामुळे परिसरातली डॉ. रत्नकुमार मुदलीयार, अरुण मिंदी, मनोज यादव यांनी समाधान व्यक्त केले.