एकाच दिवसात २००० कोरोनाबाधित बरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:07 AM2020-12-24T04:07:53+5:302020-12-24T04:07:53+5:30
नागपूर : जिल्हा माहिती कार्यालयानुसार सोमवार, २१ डिसेंबर रोजी अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६०३३ होती, तर मंगळवारी ही संख्या ४०५७ ...
नागपूर : जिल्हा माहिती कार्यालयानुसार सोमवार, २१ डिसेंबर रोजी अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६०३३ होती, तर मंगळवारी ही संख्या ४०५७ वर आली. त्यानुसार १९७६ रुग्ण बरे झाले. एकाच दिवसात एवढ्या मोठ्या संख्येत बरे झालेल्या रुग्णांची ही पहिलीच घटना आहे. यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९३.४३ टक्क्यांवर पोहचले आहे. आज ३४१ नव्या रुग्णांची नोंद झाली तर ७ रुग्णांचे मृत्यू झाले. रुग्णांची एकूण संख्या १२०६२८ झाली असून मृतांची संख्या ३८६४ वर पोहचली आहे.
नागपूर जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी चाचण्यांची संख्या पुन्हा ५ हजारांच्या खाली गेली. ३६६९ आरटीपीसीआर तर ९९७ रॅपिड अॅण्टिजेन अशा एकूण ४६६६ चाचण्या झाल्या. एकूण चाचण्यांच्या तुलनेत ७.३० टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आले. या रुग्णांमध्ये शहरातील २७४, ग्रामीणमधील ६५ तर जिल्हाबाहेरील २ रुग्णांचा समावेश आहे. मृतांमध्ये शहरातील २, ग्रामीणमधील ३ तर जिल्हाबाहेरील २ रुग्णांचे मृत्यू झाले. आज पॉझिटिव्ह रुग्णांच्या तुलनेत कमी, ३०५ रुग्ण बरे झाले. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या ११२७०७ झाली आहे. विशेष म्हणजे, सोमवारी ११०३९७ रुग्ण बरे झाले होते. त्यानुसार मंगळवारी एकूण २३१० रुग्ण बरे झाले.
-प्रयोगशाळेच्या क्षमतेपेक्षा कमी तपासण्या
नागपूर जिल्ह्यातील सहा शासकीय प्रयोगशाळेतून कोरोनाच्या चाचण्या केल्या जात आहे. परंतु क्षमतेपेक्षा कमी चाचण्या होत असल्याचे दिसून येत आहे. मेडिकलच्या प्रयोगशाळेची क्षमता हजार चाचण्या असताना आज २९९ चाचण्या झाल्या. मेयोच्या प्रयोगशाळेची क्षमताही ८०० वर असताना २१६ चाचण्या झाल्या. एम्स प्रयोगशाळेच्या चाचण्यांची क्षमता २०० वर असताना केवळ ११ चाचण्या झाल्या. माफसूच्या प्रयोगशाळेत १०२, नीरीच्या प्रयोगशाळेत १०८, नागपूर विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत २५० चाचण्या झाल्या. या तुलनेत खासगीमध्ये सर्वात जास्त, २६८३ चाचण्या झाल्या.
-दैनिक संशयित : ४६६६
-बाधित रुग्ण : १२०६२८
_-बरे झालेले : ११२७०७
- उपचार घेत असलेले रुग्ण : ४०५७
- मृत्यू : ३८६४