२ हजाराच्या नोटा चलनात दिसेनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:08 AM2021-01-09T04:08:25+5:302021-01-09T04:08:25+5:30
शरद मिरे: भिवापूर : नोटाबंदीनंतर चलनातील १ हजार व पाचशे रुपयांची नोट बाद झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेने सामान्यांच्या हातात थोपविलेली ...
शरद मिरे:
भिवापूर : नोटाबंदीनंतर चलनातील १ हजार व पाचशे रुपयांची नोट बाद झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेने सामान्यांच्या हातात थोपविलेली २ हजार रुपयाची नोट आता मात्र दिसेनाशी झाली आहे. त्यामुळे चलनातील सर्वात मोठी नोट गेली कुठे, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.
८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीची घोषणा केली होती. हा धक्का सामान्य नागरिकांपेक्षा गर्भ श्रीमंतांसाठी मोठा होता. मात्र त्याचा त्रास सामान्य नागरिकांनाच अधिक झाला. या नोटाबंदीत हजार व पाचशे रुपयाची नोट चलनातून बाद केल्यानंतर त्याची उणीव भरून काढण्याकरीता रिझर्व्ह बँकेने राष्ट्रीयीकृत बँकांच्या माध्यमातून २ हजार व ५०० रुपयाची नोट नविन डिझाईनसह बाजारात आणली. त्यानंतर काही दिवसांनी २०० रुपयांची नोट सुध्दा आली. दरम्यान, नव्याने आलेल्या या तिन्ही नोटा दैनिक व्यवहाराच्या माध्यमातून बँकेत व बाजाराममध्ये वर्ष दोन वर्षे सर्वांच्या दृष्टीस पडल्या. मात्र गत वर्षभरापासून यातील २ हजार रुपयाची नोट सामान्य नागरिकांच्या डोळ्याला दिसणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे नोटाबंदीनंतर एवढ्या मोठ्या संख्येत आलेल्या २ हजार रुपयांच्या नोटा नेमक्या गेल्यात कुठे? हा प्रश्नच आहे. भिवापूर शहरात दोन राष्ट्रीयीकृत व एक को-ऑपरेटिव्ह बँक आहे. तालुक्यातील नागरिकांचे येथे सेव्हिंग खाते तर व्यापाऱ्यांचे करंट खाते आहे. येथे ग्राहकांकडून २ हजार रुपयांची नोट फारच कमी प्रमाणात येत असल्याचे सांगण्यात आले. तर सामान्य ग्राहक व व्यापाऱ्यांशी चर्चा केली असता गत वर्षभरापासून बाजारात २ हजार रुपयांची नोट दिसत नसल्याचे सांगितले. शिवाय बँकेतून सुध्दा पाचशे व दोनशे रुपयांची नोटच मिळत असल्याचे सांगण्यात आले. शहरात को-ऑपरेटिव्ह व पतसंस्थेचे अनेक दैनिक अभिकर्ते दैनिक कलेक्शनचे काम करतात. त्यांनासुध्दा गत वर्षभरापासून २ हजार रुपयांच्या नोटेचे दर्शन झालेले नाही. एकंदरीत मोठ्या देवाणघेवाणीतसुध्दा ५००, २०० व १०० रुपयांच्या नोटेचा अधिक वापर होत आहे. तर किरकोळ देवाणघेवाणीत १००, ५०, २०, १० रुपयांची नोट दिसत आहे. अचानक दर्शन दुर्लभ झालेल्या २ हजार रुपयांच्या नोटेवरून सामान्य नागरिकांसह आर्थिक उलाढाल करणाऱ्या बँकाही आता यावर चिंतन करत आहे.
---
उद्देशालाच हरताळ फासला
वर्षानुवर्ष दडवून ठेवलेला ''''ब्लॅक मनी'''' बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने नोटाबंदी केल्याचे सांगण्यात आले. काहीअंशी ते खरे ही असले तरी, त्यानंतर चलनात आलेली २ हजार रुपयांची नोट अशी अचानक दिसेनाशी झाल्यामुळे नोटाबंदीच्या उद्देशालाच हरताळ फासल्याचे दिसते. २ हजार रुपयांच्या नोटा अनेकांनी दडवून ठेवल्यामुळेच तुटवडा निर्माण झाल्याचे आता बोलल्या जात आहे.
चलनातील सर्वात मोठी २ हजार रुपयांची नोट अशी अचानक गायब होणे म्हणजे ज्या उद्देशासाठी नोटाबंदी करण्यात आली. तो उद्देश फसल्याचे स्पष्ट होते. पूर्वीप्रमाणेच नोटाबंदीनंतर अनेकांनी या नोटा दडवून ठेवल्याचा संशय त्यामुळे बळावताे आहे. याकडे रिझर्व्ह बँकेने व केंद्र शासनाने गांभीर्याने लक्ष घालणे आवश्यक आहे.
- प्रमोद रघुशे, संचालक विद्यानिकेतन, भिवापूर