दीक्षाभूमीवर समता सैनिक दलाचे २००० सैनिक देणार सेवा; धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याची सुरक्षा व्यवस्था सांभाळणार
By आनंद डेकाटे | Published: September 2, 2023 06:12 PM2023-09-02T18:12:52+5:302023-09-02T18:14:45+5:30
विविध १५ समित्या गठीत : २४ ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा
नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा ६७ वा वर्धापन दिवस दीक्षाभूमीवर साजरा करण्यात येणार आहे. यासाठी देश विदेशातून लाखो अनुयायी येतील. त्यांच्या दीक्षाभूमीवरील सेवा सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी नेहमीप्रमाणे समता सैनिक दल सांभाळणार असून यावेळी समता सैनिक दलाचे दोन हजारावर सैनिक दीक्षाभूमीवर सेवा देतील. तसेच शासन, प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि दीक्षाभूमी स्मारक समितीला सहकार्य करतील.
दीक्षाभूमी येथे २४ ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा होणार आहे. त्यासाठी दोन दिवसांपूर्वीपासूनच अनुयायांचे येथे येणे सुरू होते. मुख्य सोहळ्याच्या दुसऱ्या दिवसापर्यंत लोकांची गर्दी असते. २२ त २५ ऑक्टोबर दरम्यान चार दिवस समता सैनिक दलाचे सुरक्षा व्यवस्था शिबीर राहणार आहे. दलाचे विदर्भ जीओसी राजकुमार वंजारी यांची शिबीर प्रमुख म्हणून तर सुरेखा टेंभुर्णे यांची उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संपूर्ण सेवा सुरक्षा व्यवस्था सुरळीत पार पडण्यासाठी सुरक्षा समिती, शिष्टाचार समिती, भोजन समिती, पुरवठा समिती, नामांकन समिती, आरोग्य दक्षता समिती, बँड पथक समिती, पथसंचलन समिती अशा १५ समित्या गठीत करण्यात आल्या आहे.
शिबीर प्रमुख राजकुमार वंजरी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच दीक्षाभूमीवरील सभागृहात बैठक पार पडली. स्मारक समितीचे सदस्य भदंत नागदीपंकर, राष्ट्रीय अध्यक्ष डी.एफ. कोचे, गजेंद्र गजभिये, संजय घोडके, अमर दीपंकर, खुशाल लाडे, प्रमोद खांडेकर, आकाश मोटघरे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. या बैठकीला विदर्भातील समता सैनिक दलाचे सैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.