लॉकडाऊनमध्ये २ हजार टन पार्सल वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 06:06 PM2020-05-04T18:06:24+5:302020-05-04T18:07:25+5:30
लॉकडाऊनदरम्यान मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने विशेष पार्सल रेल्वेगाड्यांच्या माध्यमातून २ हजार टन पार्सलची वाहतूक केली आहे. पार्सल रेल्वेगाड्यांना प्रतिसाद मिळावा यासाठी नागपूर विभागाने विविध औद्योगिक संस्था, व्यापाऱ्यांशी संवाद साधून त्यांना मालवाहतुकीसाठी प्रेरित केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊनदरम्यान मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने विशेष पार्सल रेल्वेगाड्यांच्या माध्यमातून २ हजार टन पार्सलची वाहतूक केली आहे. पार्सल रेल्वेगाड्यांना प्रतिसाद मिळावा यासाठी नागपूर विभागाने विविध औद्योगिक संस्था, व्यापाऱ्यांशी संवाद साधून त्यांना
मालवाहतुकीसाठी प्रेरित केले आहे.
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार यांच्या नेतृत्वात वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील, सहायक वाणिज्य व्यवस्थापक विजय थूल, एस. जी. राव यांच्या निरीक्षणाखाली अधिकाधिक पार्सलची वाहतूक करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यासाठी ऑनलाईन बैठक घेऊन स्टॉक होल्डर्स, ट्रेडर्स, व्यापारी, कृषी संस्था, चेंबर ऑफ कॉमर्स, औद्योगिक संस्थांसोबत संपर्क साधला. पार्सल सेवेबाबत नागरिकांना माहिती देण्यासाठी स्थानिक नेते, रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यांची मदत घेण्यात आली. विशेष पार्सल रेल्वेगाड्यांची माहिती विविध प्रसार माध्यमांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली. ग्राहकांच्या आवश्यकतेसाठी पार्सल ट्रॅफिक टास्क फोर्सचे गठन करण्यात आले. त्यामुळे लॉकडाऊनदरम्यान नागपूर विभागातून ११४२ टन पार्सल वाहतूक, गोधनी ते न्यू तिनसुखिया येथे ८९६ टन पार्सलची वाहतूक करण्यात आली. यामुळे नागपूर विभागाला ६३.३६ लाख रुपयाचे उत्पन्न मिळाले.
आठ विशेष पार्सल रेल्वेगाड्यांचा विस्तार
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी ३ मेपर्यंत विशेष पार्सल रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला होता. परंतु रेल्वेत लॉकडाऊन वाढल्यामुळे आठ विशेष पार्सल रेल्वेगाड्यांचा विस्तार करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
कोरोनामुळे रेल्वेत लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे सर्व प्रवासी रेल्वेगाड्या ठप्प झाल्या आहेत. परंतु जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी रेल्वे प्रशासनाने मालगाड्या, विशेष पार्सल रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ३ मेपर्यंत विशेष पार्सल रेल्वेगाड्या, मालगाड्यांची वाहतूक सुरू होती. परंतु रेल्वेत पुन्हा १७ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आठ विशेष पार्सल रेल्वेगाड्यांचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार रेल्वेगाडी क्रमांक ००१०९ मुंबई-नागपूर विशेष पार्सल रेल्वेगाडी १५ मेपर्यंत, रेल्वेगाडी क्रमांक ००११० नागपूर-मुंबई विशेष पार्सल रेल्वेगाडी १५ मेपर्यंत, रेल्वेगाडी क्रमांक ००११३ मुंबई-शालिमार विशेष पार्सल रेल्वेगाडी १५ मेपर्यंत, रेल्वेगाडी क्रमांक ००११४ शालिमार-मुंबई विशेष पार्सल रेल्वेगाडी १७ मेपर्यंत, रेल्वेगाडी क्रमांक ००६०७ बंगळुरू-गोरखपूर विशेष पार्सल रेल्वेगाडी १० मेपर्यंत आणि रेल्वेगाडी क्रमांक ००६०८ गोरखपूर-बंगळुरू विशेष पार्सल रेल्वेगाडी १३ मेपर्यंत चालविण्यात येणार आहे. तर रेल्वेगाडी क्रमांक ००६२१ बंगळुरू-हजरत निजामुद्दीन विशेष पार्सल रेल्वेगाडी ७ मेपर्यंत तसेच रेल्वेगाडी क्रमांक ००६२२ निजामुद्दीन-बंगळुरू विशेष पार्सल रेल्वेगाडी ९ मेपर्यंत चालविण्यात येणार आहे.