२०२० पर्यंत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 09:03 PM2018-07-13T21:03:44+5:302018-07-13T21:05:23+5:30

चैत्यभूमी दादर येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाबाबत शासन गंभीर आहे. स्मारकासाठी इंदू मिलच्या संपूर्ण साडेबारा एकर जमिनीचे हस्तांतरण झालेले आहे. नकाशा मंजूर झाला असून स्मारकाचे काम वेगाने सुरू आहे. २०२० पर्यंत स्मारक उभे राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली.

By 2020 Dr. Babasaheb Ambedkar international standard memorial will set up | २०२० पर्यंत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारणार

२०२० पर्यंत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारणार

googlenewsNext
ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : इंदू मिलच्या संपूर्ण जागेचे स्मारकासाठी हस्तांतरण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चैत्यभूमी दादर येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाबाबत शासन गंभीर आहे. स्मारकासाठी इंदू मिलच्या संपूर्ण साडेबारा एकर जमिनीचे हस्तांतरण झालेले आहे. नकाशा मंजूर झाला असून स्मारकाचे काम वेगाने सुरू आहे. २०२० पर्यंत स्मारक उभे राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी संपूर्ण साडेबारा एकर जमीन उपलब्ध झालेली नसल्याबाबतचा प्रश्न सदस्य प्रकाश गजभिये यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या उत्तरात मुख्यमंत्री म्हणाले, डॉ. आंबेडकर यांचे स्मारक आंतरराष्ट्रीय दर्जाचे होण्यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण होत आल्या आहेत. २५ एप्रिल २०१८ ला साडेबारा एकर जमिनीचे हस्तांतरण होऊन त्यावर शासनाच्या नावाची नोंद झाली आहे. यातील पाच एकरातील भाग हा सीआरझेड अंतर्गत येतो, मात्र या परिसरात हे बांधकाम येत नाही. यालाही केंद्र शासनाची मान्यता घेण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, स्मारकाचे बांधकाम जोत्यापर्यंत आले आहे. पैशाची कोणतीही अडचण नाही. यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अर्थसंकल्पात १५० कोटीची तरतूद करण्यात आली आहे. गरज भासल्यास आणखी निधी उपलब्ध केला जाईल. स्मारकाचे काम हे आराखड्याप्रमाणे व संकल्पनेनुसार करण्यात येईल.
विधिमंडळ सदस्यांपुढे या प्रकल्पाचे सादरीकरण हाईल का, असा प्रश्न विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. तर भाई जगताप यांनी प्रकल्पाचा संपूर्ण आराखडा सादरीकरणात असावा, अशी सूचना केली. यावर मुख्यमंत्री म्हणाले, विधिमंडळाचे सदस्य आणि सर्व आंबेडकरी संघटनांच्या प्रमुख नेत्यांसमोर याबाबत सादरीकरण करण्यात येईल. त्यांच्या सूचनेनुसार आणखी बदल करण्यात येईल. शिवाय स्मारकाचे दर्शन सी लिंकवरूनही व्हावे, अशी व्यवस्थाही करण्यात येईल, यासाठी नियमित पाहणी करण्याची ग्वाही त्यांनी दिली. चर्चेत सदस्य किरण पावसकर, संजय दत्त, अ‍ॅड. जयदेव गायकवाड यांनी सहभाग घेतला.

Web Title: By 2020 Dr. Babasaheb Ambedkar international standard memorial will set up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.