नक्षलवाद्यांसाठी २०२४ घातक वर्ष, १८८ हून अधिक जणांचा खात्मा, सुरक्षा यंत्रणांच्या ‘ॲक्शन प्लॅन’मुळे नक्षलवादी कोंडीत
By योगेश पांडे | Published: October 4, 2024 11:58 PM2024-10-04T23:58:42+5:302024-10-04T23:59:21+5:30
Naxalite Movement: २०२४ हे तेथील नक्षलवाद्यांसाठी घातक वर्ष ठरले आहे. आतापर्यंत या वर्षातील २७७ दिवसांमध्ये १८८ हून अधिक नक्षलवाद्यांना सुरक्षा यंत्रणांनी कंठस्नान घातले आहे.
- योगेश पांडे
नागपूर - छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी ३० नक्षलवाद्यांचा खात्मा केला. २०२४ हे तेथील नक्षलवाद्यांसाठी घातक वर्ष ठरले आहे. आतापर्यंत या वर्षातील २७७ दिवसांमध्ये १८८ हून अधिक नक्षलवाद्यांना सुरक्षा यंत्रणांनी कंठस्नान घातले आहे. काही दिवसांअगोदर नागपुरात बोलताना गृहमंत्री अमित शाह यांनी काही महिन्यांतच नक्षलवाद्यांवर मोठ्या कारवाया होणार असल्याचे संकेत दिले होते, हे विशेष.
मागील काही कालावधीपासून नक्षलवादाविरोधात सुरक्षा यंत्रणांनी ‘नो टॉलरन्स’चे धोरण अवलंबिले आहे. ज्या नक्षलवाद्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात यायचे आहे, त्यांना परत येण्याची संधी दिली जात आहे; परंतु जे नक्षलवादाचा मार्ग सोडत नाहीत, त्यांना सापळा रचून टिपले जात आहे. छत्तीसगडमधील १५ जिल्ह्यांमध्ये नक्षलवादी कारवाया सुरू आहेत. यात बस्तर, बिजापूर, दंतेवाडा, धमतरी, गरियाबंद, कांकेर, कोंडागाव, महासमुंद, नारायणपूर, राजनांदगाव, अंबागढ, खैरागढ, सुकमा, कबीरधाम, मुंगेल या जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यातही दक्षिण छत्तीसगडमध्ये याचे प्रमाण जास्त आहे. महाराष्ट्रातील गडचिरोलीतील बरेच नक्षलवादी समूहदेखील त्या भागात स्थलांतरित झाले. २०२४ मध्ये आतापर्यंत १८८ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे, तर सातशेहून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. जवळपास तेवढ्याच नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.
मागील काही वर्षांतील सर्वांत मोठी कारवाई
शुक्रवारी झालेली कारवाई ही मागील काही काळातील सर्वांत मोठी कारवाई मानली जात आहे. १६ एप्रिल रोजी बस्तरमध्ये २९ नक्षलवाद्यांना चकमकीत ठार मारण्यात आले होते. २०१६ मधील एका चकमकीत ३० जणांना कंठस्नान घालण्यात आले होते, तर २०२१ मध्ये २५ नक्षलवाद्यांना संपविण्यात आले होते.
२००९ नंतरचा सर्वाधिक संहार
केंद्र शासनाच्या आकडेवारीनुसार देशभरात १ जानेवारी २०१९ पासून आतापर्यंत जवळपास सातशे नक्षलवाद्यांना विविध चकमकीत सुरक्षा यंत्रणांनी ठार केले. २००९ साली १५४ नक्षलवाद्यांना मारण्यात आले होते. यावर्षीचा आकडा दोनशेहून अधिकवर पोहोचला आहे.
नक्षलवादावर असा होतोय प्रहार
- २०१० च्या तुलनेत हिंसेच्या प्रकरणात ७३ टक्क्यांची घट
- २०२४ मध्ये नक्षल गतिविधींमध्ये ३२ टक्क्यांची घट
- ११ वर्षांत नक्षलप्रभावित जिल्हे १२६ वरून ३८ वर