... तर २०२५ पर्यंत जगातील ४ अब्ज लाेक हवामान बदलाने होणार प्रभावित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2021 09:15 PM2021-12-11T21:15:49+5:302021-12-11T21:17:10+5:30
Nagpur News येत्या चार वर्षात म्हणजे २०२५ पर्यंत हवामान बदलामुळे जगातील ४ अब्ज लाेकांना त्याचे प्रतिकूल परिणाम भाेगावे लागतील, अशी शक्यता राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशाेधन संस्था (नीरी) च्या पर्यावरण पदार्थ विज्ञान विभागाचे वैज्ञानिक डाॅ. सुवा लामा यांनी व्यक्त केली.
नागपूर : वैश्विक तापमान सातत्याने वाढत असून दरवर्षी ते असेच वाढत जाणार आहे. सध्या तापमान वाढीची सरासरी १.६० अंशावर आहे आणि ही धाेक्याची पातळी आहे. मानवाने आता काही हालचाली केल्या नाही तर परिस्थिती बिघडण्याची शक्यता आहे. येत्या चार वर्षात म्हणजे २०२५ पर्यंत हवामान बदलामुळे जगातील ४ अब्ज लाेकांना त्याचे प्रतिकूल परिणाम भाेगावे लागतील, अशी शक्यता राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशाेधन संस्था (नीरी) च्या पर्यावरण पदार्थ विज्ञान विभागाचे वैज्ञानिक डाॅ. सुवा लामा यांनी व्यक्त केली.
वनराई फाउंडेशनच्या वतीने ‘हवामान बदल व त्याचे पर्जन्य, हिवाळा व मानवी आरोग्यावर होणारे परिणाम’ या विषयावर आयाेजित चर्चासत्रात ते बाेलत हाेते. नीरीचे माजी संचालक डाॅ. सतीश वटे यांच्या संकल्पनेतून आयाेजित या चर्चासत्रात वनराईचे अध्यक्ष गिरीश गांधी, जेएनयुच्या पर्यावरण विज्ञान शाळा, दिल्लीचे अधिष्ठाता प्रा. उमेश कुलश्रेष्ठ, प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूरचे उपमहासंचालक एम.एल. साहू, इंडियन कॅन्सर साेसायटीचे डाॅ. मनमाेहन राठी यांनी मार्गदर्शन केले. डाॅ. लामा यांनी पाऊस पॅटर्न समूळ बदलल्याचे त्यांनी नमूद केले. पूर्वी पाऊस वेळापत्रानुसार ठरावीक कालावधीत पडायचा. मात्र मागील काही वर्षात ताे कधी एकाचवेळी भरपूर पडताे तर अनेक दिवस पडतही नाही. ढगफुटी किंवा अतिपावसाचे प्रकार वाढले आहेत. त्यात व्यापकताही दिसून येत नाही. हवामान बदलाचे परिणाम थांबवायचे असतील कार्बन उत्सर्जन कमी करून नैसर्गिक उपाय याेजावे लागतील, असे त्यांनी सूचित केले.
हवामान केंद्राचे माेहनलाल साहू यांनी, मागील १०० वर्षाच्या नाेंदीचा उल्लेख करीत विदर्भात पर्जन्यमान कमी कमी हाेत गेल्याची माहिती दिली. हवामान बदल सातत्याने हाेणारी प्रक्रिया आहे आणि आपण ती थांबवू शकत नाही. त्याचे जैवविविधतेवर परिणाम दिसूनही येत आहेत. त्याचा प्रभाव कमी करायचा असेल तर निसर्गातील मानवी हस्तक्षेप थांबविणे नितांत गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
प्रा. उमेश कुलश्रेष्ठ यांनी चेन्नईतील पूर, हिमाचल प्रदेशातील ढगफुटी अशा मागील काही वर्षातील अनेक घटनांच्या नाेंदी समाेर ठेवत हवामान बदलामुळे हाेत असलेल्या परिणामांची कारणमिमांसा मांडली. मानवी हस्तक्षेपामुळे हाेत असलेले निसर्गाचे शाेषण, इंधनाचा प्रचंड वाढलेला वापर, औद्याेगिकरणाची स्पर्धा या घटकांमुळे निसर्गाचा असमताेल वाढल्याचे नमूद केले.
डाॅ. मनमाेहन राठी म्हणाले, आपल्या शरीराचे चक्र निसर्गावर अवलंबून आहे. तापमान असेच वाढत राहिले तर निसर्गात असमताेल वाढेल व त्याचा परिणाम मानवी शरीरावर हाेईल. अनुकूल वातावरण मिळाले तर वेगवेगळ्या विषाणूंचा प्रभाव वाढेल व त्यातून जलप्रदूषण, अन्नप्रदूषणातून माणसांवर गंभीर आजारांचा विळखा वाढेल. गेल्या काही वर्षात वेगवेगळ्या आजाराचे प्रमाण वाढले आहे, हे त्याचेच द्याेतक असल्याचे डाॅ. राठी यांनी स्पष्ट केले. संचालन नितीन जतकर यांनी केले. नीलेश खांडेकर यांनी आभार मानले.