२०६० मध्ये ओझाेन थर गाठणार १९८० ची पातळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:11 AM2021-09-16T04:11:47+5:302021-09-16T04:11:47+5:30
नागपूर : सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांपासून पृथ्वीवरील सजीव सृष्टीचे संरक्षण करणारा ओझाेन थर आता सुरक्षित हाेत आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ...
नागपूर : सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांपासून पृथ्वीवरील सजीव सृष्टीचे संरक्षण करणारा ओझाेन थर आता सुरक्षित हाेत आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ५० किमीच्या वर असणाऱ्या ओझाेन थराला क्लाेराेफ्लुराेकाॅर्बन (सीएफसी) आणि तत्सम प्रदूषित घटकांमुळे माेठा खड्डा पडला हाेता. विकसित देशांनी १९८५ पासून सुरू केलेल्या प्रयत्नांमुळे हा खड्डा भरत आल्याचे डिसेंबर २०२० मध्ये जाहीर करण्यात आले. जगभरातील देशांच्या सर्वसमावेशी प्रयत्नांमुळे २०६० मध्ये ओझाेनचा थर १९८० मध्ये असलेली स्थिती गाठेल, असा समाधानकारक विश्वास जागतिक संघटनेकडून व्यक्त केला जात आहे.
अंटार्क्टिकाच्या प्रदेशात ओझाेन थराला २४ दशलक्ष चाैरसकिमीपर्यंत भगदाड पडले हाेते व ते विस्तारले हाेते. यामुळे या प्रदेशामध्ये प्रचंड तापमान वाढ हाेणे सुरू झाले हाेते. यानंतर रशिया, अमेरिका व खाली ऑस्ट्रेलिया खंडातील देशांना माेठा धाेका निर्माण हाेणार हाेता. हा धाेका लक्षात घेता ओझाेनला धाेका पाेहचविणारे प्रदूषके बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला, यामध्ये १९७ देशांनी स्वाक्षऱ्या केल्या. यालाच १९८६ चे ‘माेन्टरियल प्राेटाेकाॅल’ म्हणतात. याअंतर्गत ओझाेन थराला धाेका पाेहचविणारे सीएफसी, हॅलाेन्स, मिथिल ब्राेमाईड आदी प्रदूषकांचा वापर पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. रेफ्रीजरेटर्स, एसी, ऑटाे एसी, साॅल्व्हन्ट, एअरसाेल आदी वस्तूंमध्ये सीएफसीऐवजी पर्यायी रसायनांच्या उपयाेगावर भर देण्यात आला. यानंतर रेफ्रीजरेटर्समध्ये हायड्राेक्लाेराेफ्लुराेकार्बन (एचसीएफसी) व हायड्राेफ्लुराेकार्बन (एचएफसी)चा उपयाेग करण्याचे ठरविण्यात आले. पुढे १९९२ साली माेन्टरियल प्राेटाेकाॅलमध्ये सुधारणा करून एचसीएफसी व एचएफसीच्या उपयाेगावरही बंधने घालण्यात आली. या प्रयत्नांमुळेच आता ओझाेन थर सुरक्षित स्तर गाठत आहे.
काय हाेती स्थिती
- १९८० च्या दशकात सीएफसी-१२ चे उत्पादन ४.२५ लाख टनापर्यंत गेले हाेते. सीएफसी-११ चे ३.५० लाख टन तर सीएफसी-११३ चे उत्पादन २.४० लाख टनापर्यंत हाेते.
- १९८६ मध्ये सीएफसी फेजऑऊट करून २००० सालापर्यंत उत्पादन व वापर २५ हजार टनापर्यंत खाली आणण्यात आला.
- पर्याय म्हणून वापर हाेणाऱ्या एचसीएफसी व एचएफसीच्या वापरावरही बंधने घालण्यात आली.
- विकसित देशांना २०२० पर्यंत एचसीएफसी फेजआऊट करण्याचे व विकसनशील देशांना २०३० चे लक्ष्य देण्यात आले.
- हॅलाेन्सवर बंदीसाठी विकसित देश १९९३ तर विकसनशील देशांना २०१० ची मुदत.
- मिथिल ब्राेमाईडला विकसित देश २००५ व विकसनशील देशांना २०१५ पर्यंत फेजआऊट करायचे हाेते.