‘मिहान-सेझ’मधील २३ कंपन्यांकडे अडकले २०९ कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 05:18 AM2021-02-10T05:18:48+5:302021-02-10T05:19:06+5:30
अधिकृत माहितीनुसार ‘मिहान-सेझ’ व ‘नॉन-सेझ’ भागात ११९ कंपन्यांना जमीन विकण्यात आली व त्यातून ९२५.१८ कोटींची रक्कम प्राप्त झाली. मात्र ‘सेझ’मधील १७ व ‘नॉन-सेझ’मधील ६ कंपन्यांनी अनुक्रमे १७५.४४ कोटी व ३३.५६ कोटींची रक्कम थकविली आहे.
नागपूर : ‘मिहान-सेझ’ व ‘नॉन-सेझ’ भागात आतापर्यंत ११९ कंपन्यांना जमीन विकण्यात आली आहे. मात्र, त्यातील सुमारे १९ टक्के म्हणजेच २३ कंपन्यांनी अद्यापही पूर्ण रक्कम दिलेली नाही. त्यांच्याकडे एकूण २०९ कोटींची रक्कम अडकल्याची बाब माहितीच्या अधिकारातून पुढे आली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत ‘एमएडीसी’कडे विचारणा केली होती. ‘मिहान-सेझ’मध्ये किती कंपन्यांनी काम सुरू केले आहे, ज्यांना जागेचे वाटप झाले आहे, मात्र काम सुरू झालेले नाही अशा कंपन्यांवर काय कारवाई झाली तसेच ‘एमएडीसी’मध्ये किती रिक्त जागा आहेत, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त अधिकृत माहितीनुसार ‘मिहान-सेझ’ व ‘नॉन-सेझ’ भागात ११९ कंपन्यांना जमीन विकण्यात आली व त्यातून ९२५.१८ कोटींची रक्कम प्राप्त झाली. मात्र ‘सेझ’मधील १७ व ‘नॉन-सेझ’मधील ६ कंपन्यांनी अनुक्रमे १७५.४४ कोटी व ३३.५६ कोटींची रक्कम थकविली आहे.
सद्य:स्थितीत ‘मिहान’मध्ये ‘सेझ’ व ‘नॉन-सेझ’ मिळून ३२ कंपन्या कार्यरत आहेत. याशिवाय २० नव्या कंपन्यांनी जागा मिळावी यासाठी अर्ज केला आहे, अशीही माहिती देण्यात आली.
१५ कंपन्यांना बजावली नोटीस
जमीनवाटप होऊनदेखील अनेक कंपन्यांनी काम सुरू केले नसल्याचे चित्र आहे. यासंदर्भात महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीतर्फे (एमएडीसी) १५ कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. यापैकी १२ कंपन्या ‘मिहान-सेझ’मधील असून, उर्वरित तीन कंपन्या ‘नॉन-सेझ’मधील आहेत.
‘पतंजली’चे काम ९० टक्के पूर्ण
‘पतंजली’ समूहाला जमीन देण्यावरून बराच वाद झाला होता. ‘पतंजली’च्या प्रकल्पाचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. ५०० कोटींच्या गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा उभारली असून, खेळते भांडवल उभारण्याचे काम बँकेकडे अखेरच्या टप्प्यात आहे.