बिबट्याच्या शोधासाठी लावले २१ कॅमेरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:07 AM2021-05-31T04:07:46+5:302021-05-31T04:07:46+5:30
नागपूर : शुक्रवारी येथील आयटी पार्क परिसराजवळील गायत्रीनगरात दिसलेल्या बिबट्याचा शोध अद्यापही लागलेला नाही. शुक्रवारी रात्री एका सीसीटीव्हीमध्ये तो ...
नागपूर : शुक्रवारी येथील आयटी पार्क परिसराजवळील गायत्रीनगरात दिसलेल्या बिबट्याचा शोध अद्यापही लागलेला नाही. शुक्रवारी रात्री एका सीसीटीव्हीमध्ये तो दिसला होता. त्यानंतर दोन दिवस उलटूनही त्याचा पत्ता लागलेला नाही. त्याच्या शोधासाठी लावलेल्या कॅमेरा ट्रॅपची संख्या वाढविली असून, आतापर्यंत २१ कॅमेरे या परिसरात लावण्यात आले आहेत.
शनिवारी रात्री २ वाजेपर्यंत वन विभागाच्या तीनही पथकांनी त्याचा आयटी परिसर, गायत्रीनगर, लगतचा नाला, अंबाझरी नाल्याचा परिसर, पांढराबोडी आदी ठिकाणापर्यंत शोध घेतला. मात्र, त्याचा ठावठिकाणा लागला नाही. त्याच्या शोधासाठी पहिल्या दिवशी ६ कॅमेरे लावले होते. ही संख्या वाढवून आता २१ वर गेली आहे. पुन्हा काही ठिकाणी कॅमेरे लावण्याचे नियोजन आहे. हा परिसर शहरातील असल्याने आणि मनुष्यवस्ती व सतत वर्दळ राहत असल्याने त्याच्या शोधासाठी अत्यंत दक्षता घेतली जात आहे. दरम्यान, रविवारी दुपारी सीसीएफ कल्याणकुमार, तसेच अन्य अधिकाऱ्यांनी परिसराला भेट देऊन पहाणी केली आणि आवश्यक त्या सूचना केल्या. परिसरात असलेल्या कंपन्यांमध्ये लावलेल्या सीसीटीव्हींचे फुटेज आजही तपासण्यात आले. त्यात तो आढळला नाही. या परिसरात अनेक कंपन्या असल्या तरी अनेकांकडील सीसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त असल्याचे यादरम्यान लक्षात आले.
...
परतीच्या मार्गावरही कॅमेरे
तो कोणत्या मार्गाने परत जाऊ शकतो, याचा अंदाज घेऊन त्या संभाव्य मार्गावरही कॅमेरे ट्रॅप लावण्यात आले आहेत. अंबाझरी गेटलगत पांढरबोडी (हिंगणा) या परिसरातही कॅमेरे लावले आहेत. बिबट हा अत्यंत चतुर प्राणी आहे. त्यामुळे जरासुद्धा हालचाल झाल्यावर तो सावध होतो. या परिसरात कुत्रे आणि डुकरांची संख्या अधिक असल्याने तो या परिसरात रमण्याचीही शक्यता आहे. मात्र, लोकवस्ती असल्याने हे धोकादायक आहे.
...