चिंताजनक! ऑक्टोबरचे २१ दिवस नागपूरकरांच्या घशात प्रदूषित हवा
By निशांत वानखेडे | Published: November 1, 2023 05:20 PM2023-11-01T17:20:13+5:302023-11-01T17:20:31+5:30
थंडी वाढली की प्रदूषणात वाढ : गेल्या वर्षीही होती अशीच अवस्था
नागपूर : उपराजधानीत प्रदूषणाचा विळखा अधिकाधिक गडद होत चालला आहे. हिवाळा सुरू होताच त्यात आणखी वाढ होते. यंदाही तिच अवस्था आहे. ऑक्टोबर सुरू होताच प्रदूषणात वाढ झाली असून महिन्याच्या ३१ पैकी २१ दिवस प्रदूषणाच्या स्तरात वाढ झाली होती.
विकासाकामांचे बांधकाम, वाहनांची वाढती संख्या, रस्त्यावरील धूळ, कचरा ज्वलन, औष्णिक विद्युत केंद्र व इतर उद्योगांच्या कारणांमुळे अलीकडे जिल्ह्यातील प्रदूषनात मोठी वाढ झाली आहे. त्यातून आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. मागील काही वर्षांत प्रदूषणात अग्रेसर राहणाऱ्या चंद्रपूरलाही नागपूरने प्रदूषणात मागे टाकले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार ही चिंताजनक परिस्थिती समोर येत आहे.
ऑक्टोबर महिन्यात थंडीमुळे धूळ आणि धूर जमिनीजवळ येतो,त्यामूळे शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) वाढतो. पर्यावरणाच्या मानकानुसार ० ते ५० एक्युआय हा शुद्ध हवेचे लक्षण मानले जाते. या महिन्यात केवळ एक दिवस हवा शुद्ध होती. ५१ ते १०० एक्युआय समाधानकारक असतो. ऑक्टोबरचे ९ दिवस एक्यूआय ५० ते १०० दरम्यान होता. १०० ते २०० पर्यंतचा एक्यूआय प्रदूषित श्रेणीत येते, जे १९ दिवस होते आणि दोन दिवस हा इंडेक्स २०० च्यावर म्हणजे अतिप्रदूषित श्रेणीत गेला होता. यावरून नागपूरची हवा दिवसेंदिवस प्रदूषित होत आहे, हे स्पष्ट दिसून येत आहे.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते वाढत्या प्रदूषणामुळे श्वसनासंबंधी रुग्णात वाढ झाली आहे. असे प्रदूषण श्वसनाच्या रोग्याला हानिकारक ठरणारे आहे व नवे रुग्ण वाढण्यास कारणीभूत ठरणारे आहे. शिवाय इतर आजारही बळवण्याचे प्रमाण वाढत जाते. यासाठी उपाय म्हणून बांधकामावर नियंत्रण आणण्याची मोठी गरज आहे. नागपूर शहरात धुलीकण हा प्रदूषणास कारणीभूत ठरणारा सर्वात मोठा घटक आहे. त्यावर नियंत्रण येणे गरजेचे आहे. यासाठी अधिकाधिक वृक्षलागवड, सायकलचा उपयोग वाढविणे, वाहनांवर नियंत्रण, कचरा न जाळणे, प्रशासनाने कडक उपाययोजना करणे आणि नागरिकांनीही प्रदूषण होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे आवाहन पर्यावरण तज्ज्ञांनी केले आहे.