गोसेखुर्द धरणाचे २१ दरवाजे उघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 08:32 PM2018-08-22T20:32:14+5:302018-08-22T20:34:05+5:30
गेल्या दोन दिवसात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठेही वाढू लागले आहेत. मोठ्या प्रकल्पांमधील आसोलामेंढा दिना व पोथरा हे प्रकल्प तर १०० टक्के भरले आहेत. असे असले तरी मोठ्या प्रकल्पांमध्ये एकूणच पाणीसाठा अजूनही पुरेसा झालेला नाही. मोठ्या प्रकल्पांमध्ये आतापर्यंत एकूण ३८.२३ टक्के इतकाच साठा आहे. गेसेखुर्द धरण ३३.५५ टक्के भरले आहे. परंतु खबरदारी म्हणून गोसेखुर्द धरणातील २१ दरवाजे बुधवारी पुन्हा उघडण्यात आले. एक दिवसापूर्वी संपूर्ण ३१ दरवाजे उघडण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या दोन दिवसात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठेही वाढू लागले आहेत. मोठ्या प्रकल्पांमधील आसोलामेंढा दिना व पोथरा हे प्रकल्प तर १०० टक्के भरले आहेत. असे असले तरी मोठ्या प्रकल्पांमध्ये एकूणच पाणीसाठा अजूनही पुरेसा झालेला नाही. मोठ्या प्रकल्पांमध्ये आतापर्यंत एकूण ३८.२३ टक्के इतकाच साठा आहे. गेसेखुर्द धरण ३३.५५ टक्के भरले आहे. परंतु खबरदारी म्हणून गोसेखुर्द धरणातील २१ दरवाजे बुधवारी पुन्हा उघडण्यात आले. एक दिवसापूर्वी संपूर्ण ३१ दरवाजे उघडण्यात आले होते.
नागपूर विभागात एकूण १८ मोठे प्रकल्प आहेत. त्यांची एकूण पाणीसाठा क्षमता ३५५३.७७ दलघमी इतकी आहे. या प्रकल्पांमध्ये आजच्या तारखेत एकूण १३५८.७८ दलघमी (३८.२३ टक्के) इतका पाणीसाठा आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील आसोलामेंढा या धरणातील पाणीसाठा क्षमत ५२.३३ दलघमी इतकी आहे. तो १०० टक्के भरला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील दिना या प्रकल्पाची क्षमता ६७.५४ दलघमी आहे, तर वर्धा जिल्ह्यातील पोथरा धरणाची साठा क्षमता ३५ दलघमी इतकी आहे. हेही प्रकल्प १० टक्के भरले आहेत. यासोबतच नागपूर जिल्ह्यातील लोवर नांद वना प्रकल्प ९४ टक्के, गोंदिया जिल्ह्यातील पूजारी टोला ८५ टक्के, कालीसरार ८३ टक्के भरले आहेत. याव्यतिरिक्त नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह केवळ २१.३२ टक्के, कामठी खैरी ३३.७१ टक्के, रामटेक ४४.०३ टक्के, वडगाव ६६.०४ टक्के, इटियाडोह ५८.२३ टक्के, सिरपूर ४४.६४ टक्के, बोर ३०.२७ टक्के, धाम ३४.१८ टक्के, लोवर वर्धा (टप्पा-१), २६.९७ टक्के, बावनथडी २९.१३ टक्के, धापेवाडा बॅरेज (टप्पा-२)२५.२९ आणि गोसेखुर्द धरणाची एकूण पाणीसाठा क्षमता ७४०.१७ दलघमी इतकी असून त्यात २४८.३४ दलघमी (३३.५५ टक्के) इतके भरले आहे. मोठ्या प्रकल्पातील बहुतांश प्रकल्पांना अजूनही पाण्याची प्रतीक्षा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार भंडारा जिल्ह्यात पाऊस चांगला झाल. तसेच गोसेखुर्द धरण पूर्ण क्षमतेने भरता येत नाही. त्यामुळे पाण्याचा जोर वाढला की, खबरदारी म्हणून धरणाचे दरवाजे उघडावे लागतात. सोमवारी आलेल्या पावसामुळेही गोसेखुर्दचे सर्वचे सर्व ३३ दरवाजे १ मीटरने उघडण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी पुन्हा २१ दरवाजे ०.५० मीटरने उघडण्यात आले.