चाकूच्या धाकावर २१ लाख लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:10 AM2021-09-26T04:10:05+5:302021-09-26T04:10:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - पाठलाग करत आलेल्या तीन लुटारूंनी कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्यांना चाकूचा धाक दाखवून २१ लाखांची रोकड ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - पाठलाग करत आलेल्या तीन लुटारूंनी कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्यांना चाकूचा धाक दाखवून २१ लाखांची रोकड लुटून नेली. अत्यंत वर्दळीच्या लकडगंजमधील चिंतेश्वर मंदिराजवळ शनिवारी दुपारी ३.४५ वाजता ही घटना घडली.
कमलेश शहा यांच्या कुरिअर कंपनीचे कार्यालय भुतडा चेंबरमध्ये आहे. व्यवस्थापक रोहित पटेल यांच्याकडून रमणभाई पुरुषोत्तमदास पटेल (वय ५८) आणि पीयूष मनूभाई पटेल (वय ३४) या दोघांनी शनिवारी दुपारी कार्यालयातून २१ ते २२ लाखांची रोकड घेतली. ती ॲक्टिव्हाच्या डिक्कीत ठेवून हे दोघे छापरू नगर चाैकाकडे निघाले. बैरागीपुऱ्यातील चिंतेश्वर मंदिराजवळ येताच मागून ॲक्टिव्हावर पाठलाग करत आलेल्या तीन भामट्यांनी रमणभाई आणि पीयूषला अडवले. त्यांना चाकूचा धाक दाखवून शिवीगाळ आणि मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यांची ॲक्टिव्हा हिसकावून आरोपी पळून गेले. पटेल यांनी या घटनेची माहिती रोहित आणि कमलेश शहाला कळविली आणि नंतर पोलिसांना सांगितले. भरदिवसा वर्दळीच्या भागात ही घटना घडल्याचे कळताच लकडगंजचा पोलीस ताफा घटनास्थळी धडकला. परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त लोहित मतानी, गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने, अतिरिक्त आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनीही घटनास्थळी भेट देऊन माहिती दिली. गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे पोलीस निरीक्षक प्रदीप रायन्नावार त्यांच्या सहकाऱ्यांसह पोहोचले. आरोपींच्या शोधासाठी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, ही रक्कम हवालाची असावी, असा दाट संशय आहे.
----
टीप देऊन घडविली लुटमार ?
लुटमारीची ही घटना टीप देऊन घडवून आणण्यात आली असावी, असा संशय आहे. त्यासंबंधाने पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले. वृत्तलिहिस्तोवर त्यांची चाैकशी सुरू होती.
----