धोका वाढला, हिवतापामुळे गेले २१ जीव; गडचिरोलीत १३, गोंदिया, चंद्रपूरमध्ये प्रत्येकी ४ मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 01:00 PM2023-02-04T13:00:22+5:302023-02-04T13:00:32+5:30

आरोग्य यंत्रणेची झोप उडाली

21 people died by malaria; 13 deaths in Gadchiroli, 4 deaths each in Gondia, Chandrapur | धोका वाढला, हिवतापामुळे गेले २१ जीव; गडचिरोलीत १३, गोंदिया, चंद्रपूरमध्ये प्रत्येकी ४ मृत्यू

धोका वाढला, हिवतापामुळे गेले २१ जीव; गडचिरोलीत १३, गोंदिया, चंद्रपूरमध्ये प्रत्येकी ४ मृत्यू

googlenewsNext

नागपूर : मागील वर्षी पाऊस लांबल्याने व मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढून हिवतापामुळे २१ जणांचा जीव गेला. यात एकट्या गडचिरोली जिल्ह्यातील १३, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येकी ४ मृत्यू आहेत.

२०३० पर्यंत देश हिवतापमुक्त करण्याचे आवाहन केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी केले आहे. परंतु नागपूर विभागातील २१ मृत्यूंनी आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. विभागाने आतापासून हिवताप नियंत्रण कार्यक्रमाला गंभीरतेने घेत हिवतापासाठी अतिसंवेदनशील गावांना लक्ष्य केले आहे.

- तीन वर्षात पहिल्यांदाच वाढले मृत्यू

उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर मंडळने माहिती अधिकारात अभय कोलारकर यांना उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, नागपूरसह गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा व वर्धा जिल्हा मिळून तीन वर्षांत हिवातापाचे मृत्यू वाढल्याचे पुढे आले. नागपूर विभागात २०२० मध्ये ७,०५१ रुग्ण व १३ मृत्यू, २०२१ मध्ये १२,९९९ रुग्ण व १४ मृत्यू तर २०२२ मध्ये ९,७२९ रुग्ण व २१ मृत्यूची नोंद झाली.

- डेंग्यूचा एकही मृत्यू नाही

नागपूर विभागात २०२० मध्ये डेंग्यूचे ५०३ रुग्ण व २ मृत्यू असताना २०२१ मध्ये रुग्णांची संख्या जवळपास सात पटीने वाढून ३,६२८ झाली. या वर्षी २४ रुग्णांचे बळी गेले. मात्र, २०२२ मध्ये रुग्णांची संख्या पुन्हा कमी होऊन ५५२ वर स्थिरावली. विशेष म्हणजे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.

- टायफाइड, कॉलराच्या रुग्णांत वाढ

नागपूर विभागात मागील वर्षी जलजन्य आजारांमध्ये विषमज्वर (टायफाइड) व पटकी (कॉलरा) या आजाराच्या रुग्णांत वाढ झाली. २०२० मध्ये टायफाइडचे २,७७१ रुग्ण आढळून आले असताना २०२२ मध्ये रुग्णांची संख्या ६,८५८ वर गेली. तर २०२० मध्ये कॉलराचा एकही रुग्ण नसताना २०२२ मध्ये तब्बल ३६८ रुग्ण व ७ मृत्यूंची नोंद झाली.

- स्वाइन फ्लूचे ६२ मृत्यू

२०२० मध्ये स्वाइन फ्लूचे ६ रुग्ण असताना २०२२ मध्ये तब्बल ५५९ रुग्ण आढळून आले. यातील ६२ रुग्णांचे मृत्यू झाले. मागील वर्षी स्क्रब टायफसच्या रुग्णांतही वाढ झाली. ५५ रुग्ण व २ मृत्यूची नोंद झाली.

- सहा जिल्ह्यात कोरोनाचे १४५ मृत्यू

कोरोना संपला असला तरी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत नागपूर विभागातील सहा जिल्ह्यात १,३५,८४९ रुग्ण आढळून आले. यातील १४५ रुग्णांचे मृत्यू झाले.

Web Title: 21 people died by malaria; 13 deaths in Gadchiroli, 4 deaths each in Gondia, Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.