उन्हाचा प्रकोप टाळण्यासाठी नागपुरात दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत २१ सिग्नल बंद ठेवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2022 08:40 PM2022-05-05T20:40:08+5:302022-05-05T20:41:38+5:30
Nagpur News नागपूरकरांना दिलासा देण्यासाठी शहर वाहतूक पोलिसांनी शहरातील २१ सिग्नल दुपारी १२ ते ४ या वेळेत बंद ठेवण्याचा निर्णय घेऊन महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
नागपूर : उपराजधानीत उन्हाचा पारा ४५ अंशावर गेला आहे. अशा स्थितीत सिग्नलवर थांबणे म्हणजे वाहन चालकांसाठी त्रासदायक होत आहे. त्यामुळे नागपूरकरांना दिलासा देण्यासाठी शहर वाहतूक पोलिसांनी शहरातील २१ सिग्नल दुपारी १२ ते ४ या वेळेत बंद ठेवण्याचा निर्णय घेऊन महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
उपराजधानीत कडक ऊन पडत आहे. दुपारच्या वेळी उन्हामुळे नागरिकांची लाहीलाही होत आहे. अशा स्थितीत सिग्नलवर ६० सेकंद थांबणे म्हणजे उन्हात होरपळून निघणे होय. त्यामुळे नागरिकांना होत असलेला त्रास लक्षात घेता वाहतूक पोलीस उपायुक्त सारंग आव्हाड यांनी शहरातील २१ चौकांतील सिग्नल दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. उन्हाचा प्रकोप कमी होईपर्यंत हा निर्णय लागू राहणार आहे. याशिवाय उन्हात वाहतूक पोलिसांना कर्तव्य बजावावे लागते. वाहतूक पोलिसांची गैरसोय होऊ नये यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुढाकार घेऊन वाहतूक पोलिसांना ५०० गॉगल, ७०० पाण्याच्या बॉटल्स आणि हँडग्लोज देण्यात आले आहेत. सिग्नल बंद असले तरी वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन शहर वाहतूक पोलिसांनी केले आहे.
अभ्यास करून आणखी सिग्नल बंद करण्याचा निर्णय घेणार
‘सध्या शहरातील २१ चौकांतील वाहतूक सिग्नल बंद करण्यात आले आहेत. शहरात इतर ठिकाणी सिग्नल बंद करण्याची गरज आहे काय, याचा अभ्यास करण्यात येत आहे. गरज भासल्यास आणखी काही सिग्नल बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल.’
-सारंग आव्हाड, वाहतूक पोलीस उपायुक्त, नागपूर शहर