Nagpur | अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; गर्भधारणा झाल्याने प्रकार उघडकीस, आराेपीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2022 03:01 PM2022-10-14T15:01:26+5:302022-10-14T15:02:04+5:30
आई-वडिलांनी मुलीला विश्वासात घेत विचारपूस केली असता, तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला
नागपूर : आराेपीने अल्पवयीन मुलीच्या घरात शिरून बळजबरीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. दरम्यान, पीडित मुलगी पाच महिन्यांची गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. पीडितेच्या तक्रारीवरून पाेलिसांनी आराेपीविरुद्ध गुन्हा नाेंदवून त्यास अटक केली आहे. ही घटना बुटीबाेरी पाेलीस ठाण्यांतर्गत नुकतीच घडली.
अक्षय संजय मडावी (वय २१, रा. सालई, ता. हिंगणा, हल्ली मु. भान्सुली, ता. नागपूर ग्रामीण) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. मे २०२२ दरम्यान १४ वर्षीय मुलगी घरी एकटी असताना आराेपी हा माेटारसायकलीची चावी मागण्याच्या बहाण्याने तिच्या घरात शिरला. दरम्यान, मुलीने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केल्यामुळे आराेपीने तिला जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. शिवाय, याबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास तिला जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडित मुलगी प्रचंड घाबरल्याने घडलेला प्रकार तिने कुणालाही सांगितला नाही.
दरम्यान, तिला मासिक पाळी येत नसल्याने तिच्या आई-वडिलांनी महिला डाॅक्टरकडे नेले असता, ती पाच महिन्यांची गर्भवती असल्याची बाब समाेर आली. आई-वडिलांनी मुलीला विश्वासात घेत विचारपूस केली असता, तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. यावरून मुलीसह तिच्या आई-वडिलांनी पाेलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी बुटीबाेरी पाेलिसांनी आराेपीविरुद्ध भादंवि कलम ३७६ (३), ५०६, सहकलम ४ पाेक्साे ॲक्टनुसार गुन्हा नाेंदविला असून, आराेपीला अटक केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक आरती उघडे करीत आहेत.