नागपूर शहरातील २१० नाले झाले स्वच्छ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 07:31 PM2020-06-08T19:31:33+5:302020-06-08T19:33:11+5:30
पावसाळ्याच्या दिवसात तुंबलेल्या नाल्यातील पाणी वस्त्यात शिरण्याचा धोका असतो. याचा विचार करता महापालिकेच्या आरोग्य (स्वच्छता) विभागातर्फे शहरातील २२७ नाले स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. यातील २१० नाल्यांतील गाळ, कचरा व वाढलेली झुडपे काढण्यात आली. उर्वरित १७ नाल्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पावसाळ्याच्या दिवसात तुंबलेल्या नाल्यातील पाणी वस्त्यात शिरण्याचा धोका असतो. याचा विचार करता महापालिकेच्या आरोग्य (स्वच्छता) विभागातर्फे शहरातील २२७ नाले स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. यातील २१० नाल्यांतील गाळ, कचरा व वाढलेली झुडपे काढण्यात आली. उर्वरित १७ नाल्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे.
शहरात एकूण २२७ नाले असून गांधीबाग झोनमध्ये सर्वाधिक ४८ नाले असून सर्वांत कमी १३ नाले हनुमाननगर झोनमध्ये आहेत. नदी स्वच्छता अभियानासोबतच नाले स्वच्छता अभियानही सुरू करण्यात आले होते. नाले हे वस्त्यांना लागून असल्याने पावसाळ्यात वस्त्यात पाणी शिरण्याची भीती अधिक असते. शिवाय नाल्यांचे पात्र अरुंद असल्याने तासाभराच्या पावसातही ते तुडुंब भरून वाहतात. जोराचा पाऊस झाल्यास अनेक वस्त्यांमध्ये तर नाल्यांमधील पाणी शिरते. यामुळे पुरासारखी परिस्थिती असते. यामुळे पावसाळ्यापूर्वी नाले स्वच्छ करणे आवश्यक असते. त्यानुसार नाले सफाई १० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार मनुष्यबळ व यंत्रसामग्रीच्या माध्यमातून नाले सफाई करण्यात आली.
जे नाले अरुंद आहेत अशा नाल्यांची स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आली. मोठ्या नाल्यात छोटे पोकलेन उतरवून स्वच्छता करण्यात आली. पावसाळ्यात नाल्यांतील पाणी शहरातील तीनही नद्यांमध्ये मिसळते. त्यामुळे नद्यांसोबतच नाल्यांची स्वच्छता तितकीच महत्त्वाची ठरते. तीन वर्षांपूर्वी शहरातील नाल्यात वाहून गेल्याच्या दोन घटना घडल्या होत्या. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नाले सफाई व खोलीकरण करणे गरजेचे असते.
१० जूनपर्यंत सर्व नाल्यांची स्वच्छता
पावसाळ्यात नाल्याकाठावरील वस्त्यात पाणी शिरू नये यासाठी शहरातील २२७ नाल्यांची महिनाभरापूर्वी स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली. ८ जूनपर्यंत २१० नाल्यांची स्वच्छता करण्यात आली. उर्वरित १७ नाल्यांचे काम सुरू असून १० जूनपर्यंत पूर्ण होईल.
डॉ. प्रदीप दासरवार, उपायुक्त, मनपा
झोननिहाय नाल्यांची संख्या
लक्ष्मीनगर -२२
धरमपेठ -३४
हनुमाननगर- १३
धंतोली -१६
नेहरूनगर- १५
गांधीबाग -४८
सतरंजीपुरा- २०
लकडगंज -१४
आसीनगर -१५
मंगळवारी -२९
.................
एकूण -२२७
कमीत कमी खर्चात नाले सफाई
मागील वर्षीच्या तुलनेत अर्ध्यापेक्षा कमी खर्चात अभियान पूर्णत्वाकडे आहे. २२७ पैकी २१० नाल्यांची सफाई पूर्ण झाली आहे. यंदा केवळ ४३ लाख ७९ हजार २८० रुपये एवढा निधी नाले सफाईकरिता प्रस्तावित करण्यात आला आहे. मागील वर्षीच्या खर्चाच्या तुलनेत हा निधी केवळ ४३ टक्के आहे. मागील वर्षी नाले सफाईकरिता १ कोटी ३३ लाख ३० हजार ३६० रुपये निधी प्रस्तावित करण्यात आला होता. त्यापैकी १ कोटी २ लाख ९५ हजार ६१८ रुपये एवढा निधी खर्च करण्यात आला होता.