कोराडी देवी मंदिरासाठी २१४ कोटी रुपयांचा निधी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 02:02 PM2023-02-09T14:02:57+5:302023-02-09T14:03:57+5:30

तिसऱ्या व चौथ्या टप्प्याच्या विकास आराखड्यास मान्यता

214 crores fund for Koradi Devi Temple nagpur | कोराडी देवी मंदिरासाठी २१४ कोटी रुपयांचा निधी

कोराडी देवी मंदिरासाठी २१४ कोटी रुपयांचा निधी

googlenewsNext

नागपूर : कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानमध्ये तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून विकासकामे सुरू आहेत. यापूर्वीच दोन टप्प्यांना शासनाने मान्यता दिली असून, या आराखड्यातील २१४ कोटी रुपयांच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे.

श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय शिखर समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे, आ. आशिष जयस्वाल, आ. टेकचंद सावरकर, मुख्य सचिव मनूकुमार श्रीवास्तव, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी आदी उपस्थित होते.

श्री महालक्ष्मी जगदंबा माता संस्थान कोराडीच्या तिसऱ्या व चौथ्या टप्प्याच्या प्रस्तावाला जिल्हास्तरीय समितीने यापूर्वीच मान्यता दिली आहे. तिसरा टप्पा १४०.७६ कोटी रुपये तर चौथा टप्पा ७४.१७ कोटी असा एकूण २१४.९४ कोटी रुपयांचा असून, या आराखड्याला मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मान्यता दिली आहे. या आराखड्यात वाहनतळ, प्रवेशद्वारे, प्रशासकीय इमारत, तिकीट काऊंटर, फाऊंटेन, देवीच्या ९ शक्तिपीठांची आणि ९ रूपांची प्रतिकृती, म्युझियम, सभागृह, उद्यान आदी बाबींचा समावेश आहे. या दोन्ही टप्प्यांमधील कामे तीन वर्षांत पूर्ण करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. श्री महालक्ष्मी जगदंबा माता संस्थान कोराडीच्या तिसऱ्या व चौथ्या टप्प्यासाठी दरवर्षी प्रत्येकी ५० कोटी रुपये निधी आवश्यकतेनुसार उपलब्ध करून देण्यात येतील.

नागपूर सुधार प्रन्यासच्या वतीने यावेळी कोराडी येथील पर्यटन स्थळाच्या विकासाबाबत सादरीकरण करण्यात आले. त्यातून आराखड्यातील प्रस्तावित कामांची माहिती उपस्थितांना दिली.

२२० कोटींची कामे पूर्णत्वास

कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा माता संस्थान हे पौराणिक मंदिर असून, नगरविकास विभागाच्या वतीने टप्पानिहाय विकास आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यापूर्वीच पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यासाठी सुमारे २२० कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजुरी मिळाली असून, कामेदेखील पूर्णत्वास जात आहेत.

Web Title: 214 crores fund for Koradi Devi Temple nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.