नागपुरातील डागा रुग्णालयात २१६ नवजात शिशूंचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 09:46 PM2018-11-06T21:46:11+5:302018-11-06T21:47:51+5:30
डागा स्मृती शासकीय रुग्णालयात वर्षभर महिला रुग्णांची गर्दी असते. गरीब व वंचित कुटुंबातील महिला प्रसुतीसह विविध कारणांसह येत असतात. या इस्पितळात ३३ महिन्यांच्या कालावधीत १२००हून अधिक प्रसुती झाल्या. तर २१६ नवजात शिशूंचा विविध कारणांमुळे मृत्यू झाला. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डागा स्मृती शासकीय रुग्णालयात वर्षभर महिला रुग्णांची गर्दी असते. गरीब व वंचित कुटुंबातील महिला प्रसुतीसह विविध कारणांसह येत असतात. या इस्पितळात ३३ महिन्यांच्या कालावधीत १२००हून अधिक प्रसुती झाल्या. तर २१६ नवजात शिशूंचा विविध कारणांमुळे मृत्यू झाला. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत डागा इस्पितळाकडे विचारणा केली होती. १ जानेवारी २०१६ ते ३० सप्टेंबर २०१८ या कालावधीत ‘डागा’मध्ये बाह्यरुग्ण व आंतररुग्ण विभागात किती जणांनी उपचार घेतले, किती महिलांची प्रसुती झाली, किती नवजात शिशूंचे मृत्यू झाले, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार १ जानेवारी २०१६ ते ३० सप्टेंबर २०१८ या कालावधीत ‘डागा’मध्ये एकूण ४० हजार ३७ प्रसुती झाल्या. याची सरासरी काढली तर दर महिन्याला १२००हून अधिक प्रसुती झाल्या. या कालावधी ३९ हजार ९२१ बालकांचा जन्म झाला. तर २१६ नवजात शिशूंचा मृत्यू झाला. ३ मातांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.
सुमारे सहा लाखांहून अधिक रुग्णांवर उपचार
३३ महिन्यांच्या कालावधीत ‘डागा’मध्ये बाह्यरुग्ण विभागात ४ लाख ९३ हजार ८३ रुग्णांवर उपचार झाले, तर आंतररुग्ण विभागात हीच संखया १ लाख ३ हजार २२३ इतकी होती. दोन्ही विभाग मिळून ५ लाख ९६ हजार ३०६ रुग्णांवर उपचार झाले. २०१७ या वर्षात सर्वाधिक २ लाख ५१ हजार ९२७ रुग्णांवर उपचार करण्यात आले.