नागपुरात असंवेदनशीलतेचा कळस, २२ तास उपचारांविना रस्त्याच्या कडेलाच; अपघातातील जखमीचा मृत्यू
By योगेश पांडे | Updated: April 7, 2025 22:03 IST2025-04-07T22:02:52+5:302025-04-07T22:03:37+5:30
शेकडो वाहन चालकांपैकी कुणीही दिला नाही मदतीचा हात

नागपुरात असंवेदनशीलतेचा कळस, २२ तास उपचारांविना रस्त्याच्या कडेलाच; अपघातातील जखमीचा मृत्यू
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : एका भरधाव पिकअप वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या व्यक्तीचा रस्त्याच्या कडेला मृत्यू झाला. दुर्दैवाची बाब म्हणजे तब्बल २२ तास संबंधित व्यक्ती एकाच जागेवर पडून होता. मात्र, कुणीही त्याला दवाखान्यात नेण्याची तसदी दाखविली नाही. कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून, त्या रस्त्यावरून हजारो वाहन चालक गेले असताना, एकानेही मदतीचा हात न दिल्याने नागरिकांमध्ये इतकी असंवेदनशीलता का वाढते आहे, असा सवाल निर्माण होत आहे.
गोवर्धन भगवानदास शाहू (४३, शनी मंदिराजवळ, कळमना) असे मृतकाचे नाव आहे. रविवारी सकाळी सव्वादहा वाजताच्या सुमारास जुना कामठी मार्ग येथील अन्ना दारू भट्टीसमोरील रस्ता ओलांडताना त्यांना एका पांढऱ्या रंगाच्या पिकअप व्हॅनने धडक दिली. त्यात शाहू यांच्या पायाला मार लागला व ते खाली पडले. त्यांना प्रभू चौधरी (३५, गणेशनगर, कळमना) याने भट्टीसमोरील एका कबाडी दुकानाच्या टिनाच्या शेडमध्ये लेटविले. शाहू यांना बरे वाटेल, असे वाटल्याने चौधरी तेथून निघून गेला. सोमवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास चौधरी देशी दारूच्या भट्टीसमोर मित्रासोबत आला असता त्याला शाहू तेथेच झोपलेले दिसले. त्याने मित्राला रविवारच्या अपघाताबाबत सांगितले व दोघांनी जाऊन शाहू यांना उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, शाहू निपचित पडले होते. चौधरीच्या मित्राने पोलिसांना फोन करून सूचना दिली. तेथे काही वेळातच गर्दी जमली. गर्दीतून एक महिला समोर आली व ती नेमकी शाहू यांची पत्नी निघाली. पोलिसांनी शाहू यांना मेयो इस्पितळात नेले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. प्रभू चौधरीच्या तक्रारीवरून कळमना पोलिस ठाण्यात अज्ञात पिकअप वाहनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुणालाच दिसला नाही का जखमी व्यक्ती?
संबंधित घटनास्थळाजवळच देशी दारूची भट्टी आहे, तसेच तेथून अनेक जण येणे-जाणे करतात. मात्र, शाहू हे निपचित पडलेले दिसल्यावरही एकानेही मदतीचा हात दिला नाही, जर त्यांना वेळेत उपचार मिळाले असते, तर त्यांचा जीव वाचू शकला असता. ते मजुरीचे काम करायचे.