नागपुरात उभारणार २२ ऑक्सिजन प्लांट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:07 AM2021-05-15T04:07:32+5:302021-05-15T04:07:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आरोग्य यंत्रणा सक्षम असणे किती महत्त्वाचे आहे, हे कोरोनाच्या संकटाने चांगलेच दाखवून दिले. यातच ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आरोग्य यंत्रणा सक्षम असणे किती महत्त्वाचे आहे, हे कोरोनाच्या संकटाने चांगलेच दाखवून दिले. यातच कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली असल्याने सरकारसह प्रशासन त्याच्या नियंत्रणाच्या तयारीला लागले आहे. याअंतर्गत रुग्णालय, बेड, कोविड केअर सेंटर आदी सज्ज ठेवले जात आहे. यासोबतच नागपूर जिल्ह्यात २२ ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार आहेत. हे प्लांट उभारण्यात आल्यानंतर नागपुरात ऑक्सिजन तुटवडा कधीच निर्माण होणार नाही.
जिल्हा प्रशासनाने नागपुरात एकूण २२ प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) व एस्म येथे प्रत्येकी दोन प्लांट, तर प्रादेशिक मनोरुग्णालयासह प्रत्येक तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात प्रत्येकी एक ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार आहे. लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती आहे.
५५.३० मेट्रिक टनाचे उत्पादन होणार
या २२ ऑक्सिजन प्लांटमधून दररोज एकूण ५५.३० मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध होईल. मेयो, मेडिकल व एम्समध्ये ६.२३ मेट्रिक टनाचे प्रत्येकी दोन प्लांट उभारण्यात येणार आहेत. म्हणजेच या तीन रुग्णालयांतच एकूण ३७..३८ मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादनाची क्षमता निर्माण होईल. यासोबतच १.१२ मेट्रिक टनाचे १६ प्लांट प्रत्येक जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयात उभारण्यात येतील. म्हणजेच जिल्हा रुग्णालयात एकूण १७.९२ मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादनाची क्षमता निर्माण होईल. त्यामुळे रुग्णालयांना यापुढे ऑक्सिजनसाठी इतरांवर अवलंबून राहावे लागणार नाही.
४०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा अतिरिक्त साठा आपत्कालीन परिस्थितीसाठी राखून
या २२ प्लांटशिवाय नागपुरातच ४०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा अतिरिक्त साठा आपत्कालीन परिस्थितीसाठी साठवून राहील, अशी व्यवस्थाही केली जात आहे. त्यामुळे नागपुरातील हे सर्व प्लांट पूर्णपणे तयार झाले आहेत आणि समजा एखाद्या वेळी हे सर्व प्लांट काही कारणास्तव एकाचवेळी बंद पडले, तरी नागपूरला किमान आठ दिवस पुरेल इतका ऑक्सिजनचा साठा नागपुरातच राहील. बाहेरून मागविण्याची गरजच पडणार नाही.