जिल्ह्यात डेंग्यूचे २२३ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:07 AM2021-08-01T04:07:09+5:302021-08-01T04:07:09+5:30
नागपूर : कोरोनानंतर आता डेंग्यूने ग्रामीण भागात उच्छाद मांडला आहे. पावसाळा लागल्यानंतर आतापर्यंत डेंग्यूचे २२३ रुग्ण आढळून आले आहेत. ...
नागपूर : कोरोनानंतर आता डेंग्यूने ग्रामीण भागात उच्छाद मांडला आहे. पावसाळा लागल्यानंतर आतापर्यंत डेंग्यूचे २२३ रुग्ण आढळून आले आहेत. यातील ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. डेंग्यूच्या रुग्णांची संख्या लक्षात घेता प्रभावी नियंत्रणाचे आदेश जि.प. अध्यक्षांनी दिले आहेत.
डेंग्यूसोबतच ग्रामीण भागात इतर संसर्गजन्य आजारांनीही डोके वर काढले आहे. त्यामुळे या सर्व आजारांच्या नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी अधिकाऱ्यांना दिले. बर्वे यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य समितीची बैठक पार पडली. बैठकीत ग्रामीण भागात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी कारखाने, कंपन्या व बँकांशी संपर्क साधून त्यांच्या सहकार्याने जनजागृती अभियान राबवावे. तसेच महिला मंडळ, पंचायत राज सदस्यांच्या सभा घेऊन डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती द्यावी. याप्रमाणेच बस स्थानक, बाजारपेठांमध्ये डेंग्यूची लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपायांबाबत जनजागृती करावी, असे निर्देश दिले. बैठकीला समिती सदस्यांसह जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षा मेश्राम व डॉ. साळवे उपस्थित होते.
- साथ रोग कक्षाची स्थापना
डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामीण आरोग्य यंत्रणेने कंबर कसली असून, साथरोग कक्षाची स्थापना केली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून औषधांचा साठा मुबलक आहे. नागरिकांनी आपापल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवून एक दिवस कोरडा पाळवा. तसेच गावांतील खतांचे खड्डे व उकंडे गावाबाहेर हलविण्यात यावेत. गावात कुठेही पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी. याशिवाय गावांमध्ये वेळोवेळी धूर फवारणी करा तसेच ज्या गावात पिण्यासाठी हातपंपाचे पाणी वापरण्यात येत असेल, तेथे घरोघरी मेडिक्लोरचे वाटप करण्यासही अध्यक्षांनी सांगितले.