नागपुरात कारमधून २२.३० लाखाची रोख रक्कम जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 11:17 PM2019-09-02T23:17:04+5:302019-09-02T23:18:09+5:30
गुन्हे शाखेच्या युनिट-४ ने तुकडोजी पुतळा चौकात एका कारमधून २२ लाख ३० हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुन्हे शाखेच्या युनिट-४ ने तुकडोजी पुतळा चौकात एका कारमधून २२ लाख ३० हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली. ही कारवाई शनिवारी रात्री ११.३० वाजताच्या दरम्यान करण्यात आली.
शनिवारी रात्री युनिट -४ चे पथक पेट्रोलिंग करीत होते. यादरम्यान पांढऱ्या रंगाच्या कार (एमएच/४९/एई/५६२२ ) मध्ये कथित हवालाची लाखो रुपयांची रक्कम असल्याची गुप्त माहिती मिळाली. ती कार तुकडोजी पुतळा चौकात असल्याची माहितीही मिळाली. त्या आधारावर एपीआय किरण चौगुले यांच्यासह पोलीस पथक लगेच घटनास्थळी पोहोचले. तिथे पोलिसांना पांढºया रंगाची कार आढळून आली. पोलिसांनी कार चालक अनिल शंकर बैसवारे रा. तुकडोजी पुतळा चौक याला ताब्यात घेऊन विचारपूस केली परंतु अनिल ही रक्कम कुठून आणली? कुणाची आहे ? याचे कुठलेही समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. पोलिसांनी दिलेल्या सूचनेवर आयकर विभागाचे अधिकारी व कर्मचारीही घटनास्थळी पोहोचले. यानंतर पोलिसांनी आरोपीकडून रोख रक्कम, कार व मोबाईलसह ३० लाख ५० हजाराचा माल जप्त केला. ही कारवाई एपीआय दिलीप चंदन, एएसआय रमेश उमाठे, नृसिंह दमाहे, रवींद्र राऊत, आशिष क्षीरसागर, सचिन तुमसरे, अविनाश ठाकूर, राजेंद्र तिवारी यांनी केली.