नागपुरात पकोडे खाऊ घालून सव्वादोन लाखांचे एलसीडी लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 08:41 PM2018-12-11T20:41:07+5:302018-12-11T20:44:08+5:30
पुण्यातील कारचालकाला २५ रुपयांचे पकोडे चारून येथील तिघांनी त्याच्या कारमधील २ लाख २५ हजार रुपयांचे एलसीडी टीव्ही लंपास केले. ५ डिसेंबरला सायंकाळी घडलेल्या या घटनेची तक्रार मिळाल्यानंतर सदर पोलिसांनी सोमवारी या प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पुण्यातील कारचालकाला २५ रुपयांचे पकोडे चारून येथील तिघांनी त्याच्या कारमधील २ लाख २५ हजार रुपयांचे एलसीडी टीव्ही लंपास केले. ५ डिसेंबरला सायंकाळी घडलेल्या या घटनेची तक्रार मिळाल्यानंतर सदर पोलिसांनी सोमवारी या प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
घटनेची माहिती अशी आहे की, पुण्यात श्री स्वामी शिवदत्ता एन्टरप्रायजेस आहे. तेथे विनोद नावाच्या व्यक्तीने ५ डिसेंबरला दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत फोन केले. आपल्याला २६ एलसीडी हवेत, असे सांगून नागपुरात पेमेंट करणार असल्याचेही त्याने सांगितले. त्यानुसार, एमएच १४/ सीएस ६१९३ क्रमांकाच्या अर्टिका कारमध्ये २ लाख २५ हजार किमतीचे २६ एलसीडी नागपुरात पाठविण्यात आले. कारचालकाने संबंधित मोबाईल क्रमांकावर फोन करून टीव्ही घेऊन आल्याचे त्याला कळविले. त्यानुसार, तीन जणांनी सदरमधील उत्कर्ष अपार्टमेंट, मंगळवारी बाजारसमोर कार बोलविली. तेथे एलसीडी उतरवून घेतल्यानंतर कारचालकाला आरोपींनी पकोडे खाऊ घातले. त्यानंतर चहा आणून देतो, असे सांगून आरोपी तेथून सटकले. बराच वेळ होऊनही चहा घेऊन आरोपी आले नाही त्यामुळे कारचालकाने नमूद क्रमांकावर संपर्क केला, मात्र आरोपींकडून प्रतिसाद मिळाला नाही. उशिरा रात्रीपर्यंत वाट बघूनही आरोपी आले नाही. त्यामुळे चालकाने पुण्यातील टीव्ही शोरूमच्या मालकाला ही बाब कळविली. त्यांनी दुसऱ्या दिवशी नागपूर गाठून येथे चौकशी केली. वितरकाच्यावतीने पुण्याच्या विजयनगर (दिघी) येथील उमेश शंकर मोरे यांनी सदर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.