नागपुरात ७ दिवसात २२,५७८ पॉझिटिव्हची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 08:00 AM2021-03-22T08:00:00+5:302021-03-22T08:00:12+5:30
Nagpur news कोरोनाचा वेग कमालीचा वाढला आहे. मागील ७ दिवसात २२,५७८ नव्या रुग्णांची भर पडली तर, १६५ रुग्णांचे जीव गेले. ही संख्या चिंता वाढविणारी आहे.
३,६१४ नवे रुग्ण, ३२ मृत्यूची नोंद : १७ हजारांवर चाचण्या : १,८५९ रुग्ण बरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा वेग कमालीचा वाढला आहे. मागील ७ दिवसात २२,५७८ नव्या रुग्णांची भर पडली तर, १६५ रुग्णांचे जीव गेले. ही संख्या चिंता वाढविणारी आहे. रविवारी ३,६१४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून ३२ रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णांची एकूण संख्या १,९३,०८० तर, मृतांची संख्या ४,६२४ वर पोहचली आहे. कोरोनाच्या या १२ महिन्यांच्या कालावधीत रविवारी सर्वाधिक १७,१८२ चाचण्या झाल्या. १,८५९ रुग्ण बरेही झाले.
नागपूर जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यानंतर फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून रुग्णसंख्या वाढायला सुरुवात झाली. या महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला जात आहे. १ ते ७ मार्च दरम्यान ७,९४१ रुग्णांची नोंद झाली व ५५ रुग्णांचा मृत्यू झाला. ८ ते १४ मार्च या कालावधीत १२,७७३ रुग्ण व ६९ मृत्यूची भर पडली तर मागील आठवड्यात २२,५७८ रुग्ण आढळून आले व १६५ रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णसंख्येत साधारण दुपटीने वाढ झाली. परंतु मागील दोन आठवड्यात मृत्यूदरात अधिक भर पडली आहे. विशेष म्हणजे, शहरात १५ ते २१ मार्चदरम्यान कडक निर्बंध लावण्यात आले असताना रुग्णसंख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
-शहरात २,७२१, ग्रामीणमध्ये ८८९ रुग्ण
जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून १६ हजारांवर जाणाऱ्या चाचण्या रविवारी नवा उच्चांक गाठत १७ हजारांवर पोहचल्या. १७,१८२ चाचण्यांतून शहरातील २७२१, ग्रामीणमधील ८८९ तर जिल्ह्याबाहेरील ४ रुग्ण पॉझिटिव्ह आले. मृतांमध्ये शहरातील १८, ग्रामीणमधील १० तर जिल्ह्याबाहेरील ४ मृत्यू होते. ग्रामीणमध्येही आता रुग्ण व मृत्यूचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. दैनंदिन रुग्णसंख्येच्या तुलनेत अर्ध्याहून अधिक रुग्ण बरे होत आहेत. १८५९ रुग्ण बरे झाले. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १,५९,१०८ झाली. याचा दर ८२.४१ टक्के आहे.
-२९,३४८ कोरोनाचे सक्रिय रुग्ण
नागपूर जिल्ह्यात रुग्णसंख्येच्या वाढीबरोबरच सक्रिय रुग्णांच्या संख्येतही मोठी भर पडत आहे. सध्याच्या स्थितीत २९,३४८ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. यात शहरात २३,१३३ तर ग्रामीणमध्ये ६,२१५ रुग्ण आहेत. २२,२८९ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असून ७०५९ रुग्ण रुग्णालयात व कोविड केअर सेंटरमध्ये भरती आहेत.
-तीन आठवड्यांतील धक्कादायक स्थिती
:: १ ते ७ मार्च : ७,९४१ रुग्ण : ५५ मृत्यू
:: ८ ते १४ मार्च : १२,७७३ रुग्ण : ६९ मृत्यू
:: १५ ते २१ मार्च : २२,५७८ रुग्ण : १६५ मृत्यू
:: कोरोनाची रविवारची स्थिती
दैनिक चाचण्या : १७,१८२
ए. बाधित रुग्ण : ११,९३,०८०
सक्रिय रुग्ण :२९,३४८
बरे झालेले रुग्ण : १,५९,१०८
ए. मृत्यू : ४,६२४