वर्षभरात २२६ डेंग्यूचे रुग्ण
By Admin | Published: December 25, 2015 03:37 AM2015-12-25T03:37:55+5:302015-12-25T03:37:55+5:30
उपराजधानीत गेल्या तीन वर्षांत डेंग्यूच्या रुग्ण वाढ झाली असली तरी या वर्षी रुग्णांची संख्या कमी झाल्याचे महापालिकेच्या आकडेवारीवरून दिसून येते.
गेल्या वर्षी आढळले ६०० रुग्ण : सुमारे चार लाखावर घरांची तपासणी
नागपूर : उपराजधानीत गेल्या तीन वर्षांत डेंग्यूच्या रुग्ण वाढ झाली असली तरी या वर्षी रुग्णांची संख्या कमी झाल्याचे महापालिकेच्या आकडेवारीवरून दिसून येते. २०१४ मध्ये ६०१ रुग्ण होते तर या वर्षी आतापर्यंत २२६ रुग्ण आढळून आले आहे. व्यापक जनजागृती आणि लोकांचा प्रतिसाद यामुळे ही रुग्णसंख्या कमी झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
गेल्या वर्षी डेंग्यूमुळे नागपुरातील जनता चांगलीच गारद झाली होती. ६०१ रुग्ण पॉझिटीव्ह आणि चार रुग्णांचे मृत्यू झाले होते. सप्टेंबर व आॅक्टोबर २०१४ मध्ये सर्वाधिक म्हणजे ३८५ रुग्णांची नोंद झाली होती. यामुळे महापालिकेच्या मनपाच्या हिवताप व हत्तीरोग विभागाने वर्षाच्या सुरुवातीपासूनच या रोगाला गंभीरतेने घेतले होते. या विभागाचे अधिकारी डॉ. जयश्री थोटे यांनी सांगितले, गेल्या वर्षी ७ हजार ७२० संशयित रुग्णाच्या रक्ताचे नमुने मनपाकडे तपासायला आले होते. यातील प्रत्येकांच्या घरात मनपाचे कर्मचारी पोहचून उपाययोजना केल्या.
या सोबतच मनपाच्या हद्दीतील बहुसंख्य घराची तपासणी करून जनजागृती केली. यामुळे रुग्णांचे प्रमाण या वर्षी कमी असल्याचे दिसून आले. (प्रतिनिधी)