नागपूर जिल्ह्यात गौण खनिजापासून २२९ कोटींहून अधिक महसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 08:57 PM2019-03-27T20:57:00+5:302019-03-27T21:00:10+5:30
२०१६ सालापासून दोन वर्षांत नागपूर जिल्ह्यात गौण खनिजांपासून थोडाथोडका नव्हे तर २२९ कोटींहून अधिकचा महसूल प्राप्त झाला आहे. ठरविलेल्या उद्दिष्टापैकी ९७ टक्के वसुली करण्यात जिल्हा खनिकर्म विभागाला यश आले. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : २०१६ सालापासून दोन वर्षांत नागपूर जिल्ह्यात गौण खनिजांपासून थोडाथोडका नव्हे तर २२९ कोटींहून अधिकचा महसूल प्राप्त झाला आहे. ठरविलेल्या उद्दिष्टापैकी ९७ टक्के वसुली करण्यात जिल्हा खनिकर्म विभागाला यश आले. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खनिकर्म विभागाकडे विचारणा केली होती. २०१६ पासून ते २०१८ पर्यंत खनिकर्म विभागाला गौण खनिजांपासून किती महसूल प्राप्त झाला, ठरविलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत वसुलीचे प्रमाण किती होते, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या माहितीनुसार २०१६-१७ व २०१७-१८ या वर्षांत विभागासमोर २३५ कोटींच्या महसूलाचे उद्दिष्ट होते. यापैकी २२९ कोटी ११ लाख ५१ हजारांचा महसूल जमा झाला. मार्च २०१७ पर्यंत ११५ कोटींपैकी ९३ कोटी ९८ लाख ४४ हजारांचा महसूल जमा झाला होता व ही टक्केवारी ८१.७३ इतकी होती. तर मार्च २०१८ पर्यंत १२० कोटींच्या उद्दिष्टाच्या तुलनेत १३५ कोटी १३ लाख ७ हजारांचा महसूल जमा झाला. ही टक्केवारी ११२.६१ टक्के इतकी होती.