उपकेंद्रात प्रसूतीच न झाल्यामुळे २३ आरोग्यसेविका कार्यमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:11 AM2021-09-09T04:11:53+5:302021-09-09T04:11:53+5:30
नागपूर : राष्ट्रीय आरोग्य अभियानात काम करणाऱ्या २३ आरोग्यसेविकांना अतिरिक्त असल्याचे कारण देऊन कार्यमुक्त करण्यात आले. कार्यमुक्तीच्या आदेशामध्ये स्पष्ट ...
नागपूर : राष्ट्रीय आरोग्य अभियानात काम करणाऱ्या २३ आरोग्यसेविकांना अतिरिक्त असल्याचे कारण देऊन कार्यमुक्त करण्यात आले. कार्यमुक्तीच्या आदेशामध्ये स्पष्ट केले की, त्यांच्या उपकेंद्रात एकही प्रसूती झालेली नाही. सर्व आरोग्यसेविका नागपूर जिल्ह्यातील आहेत. या आदेशाचा आरोग्यसेविका कर्मचारी संघटनांनी निषेध केला असून, मुंबईच्या आरोग्य भवनात आंदोलनाचा इशारा दिला आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत गेल्या १५ वर्षांपासून आरोग्यसेविका आरोग्य विभागात सेवा देत होत्या. त्यांना कुठलीही पूर्वसूचना न देता त्यांची सेवा संपुष्टात आणण्याचे आदेश केंद्र शासनाकडून निर्गमित झाले. या कंत्राटी आरोग्यसेविका तुटपुंज्या पगारात आरोग्य उपकेंद्रात सेवा देत होत्या. गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाकाळातही त्यांनी आरोग्यसेवेत स्वत:ला झोकून दिले होते. कोरोनाचे सर्वेक्षण, लसीकरण, घरोघरी जाऊन आरोग्य सेवा पुरविणे, नियमित लसीकरण, माता व बालसंगोपन कार्यक्रम, हत्तीरोग दुरीकरण कार्यक्रम, राष्ट्रीय क्षयरोग, कुष्ठरोग कार्यक्रम, डाटा एन्ट्री, कीटकजन्य आजाराबाबत गृहभेटी आदी कामे कंत्राटी आरोग्यसेविका सांभाळत आहे. तसेच मातामृत्युदर व बालमृत्युदर कमी करणे व शासकीय संस्थात्मक प्रसूती वाढविण्यामध्ये आरोग्यसेविकांचे मोलाचे योगदान आहे. परंतु काही आरोग्यसेविका ज्या उपकेंद्रात कार्यरत आहे. तिथे वर्षभरात एकही प्रसूती झाली नसल्यामुळे त्यांना कार्यमुक्त करण्यात आल्याने संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.
- उपकेंद्राची इमारतच नाही, तर कुठून होणार प्रसूती
भिवापूर तालुक्यातील ५ आरोग्यसेविकांना कार्यमुक्त करण्यात आले. त्यातील एका उपकेंद्राची इमारतच नाही. त्या उपकेंद्रात एकट्याच कार्यरत होत्या. उमरेड येथील एका आरोग्यसेविकेच्या उपकेंद्रात २०१९-२० मध्ये ११ प्रसूती झाल्या. तर, २०२०-२१ मध्ये ९ प्रसूती झाल्या. तरीही त्या आरोग्यसेविकेला कार्यमुक्त करण्यात आले.
- राज्यात ५९७ आरोग्यसेविकांना केले कार्यमुक्त
राष्ट्रीय आरोग्य अभियानात आरोग्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या आरोग्यसेविकांना उपकेंद्रात प्रसूती न झाल्यामुळे व लोकसंख्येचा आधार घेत राज्यातील ५९७ सेविकांना कार्यमुक्त केले. त्यांना जोपर्यंत सामावून घेतले जाणार नाही, तोपर्यंत मुंबईच्या आरोग्य भवनात आंदोलनाचा इशारा सेविकांच्या संघटनेने दिला आहे.
कुंदा सहारे, राज्य महासचिव, राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी, कर्मचारी समन्वय संघटना