आयपीएस विश्वास नांगरे पाटलांचे नाव वापरत वृद्ध महिलेला २३ लाखांचा गंडा

By योगेश पांडे | Published: August 3, 2024 12:20 AM2024-08-03T00:20:49+5:302024-08-03T00:21:14+5:30

सायबर गुन्हेगारांचे कृत्य : न केलेल्या गुन्ह्यात अटक करण्याची दिली धमकी.

23 lakhs extorted from an old woman using the name of IPS Vishwas Nangre Patil | आयपीएस विश्वास नांगरे पाटलांचे नाव वापरत वृद्ध महिलेला २३ लाखांचा गंडा

आयपीएस विश्वास नांगरे पाटलांचे नाव वापरत वृद्ध महिलेला २३ लाखांचा गंडा

योगेश पांडे - नागपूर, लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचे नाव वापरत सायबर गुन्हेगारांनी एका वृद्ध महिलेला तब्बल २३ लाखांचा गंडा घातला. त्यांनी संबंधित वृद्धेला तिचा संबंधही नसलेल्या एका खोट्या गुन्ह्यात अटक करण्याची धमकी देत भीती दाखविली. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ममता विलास बनगिनवार (६७, प्रियदर्शिनी नगर) असे फसवणूक झालेल्या ज्येष्ठ नागरिक महिलेचे नाव आहे. १५ जुलै रोजी या प्रकाराची सुरुवात झाली. त्यांना एका महिलेचा फोन आला व समोरील महिलेने साहेबांशी बोला असे म्हणत एका आरोपीला फोन दिला. समोरील व्यक्तीने ममता यांच्या क्रमांकावरून अनेक फसवणुकीच्या घटना झाल्या असून हा क्रमांक लिंक असलेल्या खात्यातून २ कोटींचे ट्रान्झॅक्शन झाले असून २० लाखांचे कमिशन मिळाल्याचे सांगितले. दुसऱ्या दिवशी ७२३७८६४०६९ या क्रमांकावरून व्हिडीओ कॉल आला. समोरील व्यक्तीने त्याचे नाव हेमराज कोळी असे सांगितले. तो पोलिसांच्या गणवेशात होता व मुंबईतील टिळक नगर ठाण्यातून बोलत असल्याची त्याने बतावणी केली. त्याने नरेश गोयल नावाच्या व्यक्तीचा फोटो दाखविला व त्याच्या कुकृत्यांमध्ये तुमचाही सहभाग असल्याचा आरोप लावला. कॅनरा बँकेत तुमचे खाते असल्याचे सांगत त्याने बोगस दस्तावेज त्यांना व्हिडीओ कॉलवर दाखविले. दुसऱ्या दिवशी त्याने परत फोन केला व विश्वास नागरे पाटील बोलतील, असे म्हणत एका अधिकाऱ्याला फोन दिला. त्यावेळी व्हिडीओ बंद झाला होता. समोरील व्यक्तीने तत्काळ ममता यांना अटक करावी, अशा सूचना कोळीला दिल्या. हे ऐकून ममता घाबरल्या. १८ जुलै रोजी त्यांचा परत फोन आला व ममता यांच्या संपत्तीची माहिती घेतली. त्यानंतर सर्व रक्कम रिझर्व्ह बँकेत जमा होईल, असे सांगून एका खात्यात पैसे जमा करायला सांगितले. ममता यांनी आरोपींच्या खात्यात एकूण २३.२० लाख रुपये जमा केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपींविरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम २०४, ३१८(४), ३१९(२), ३३६(३), ३३८, ३४०(१), ३४०(२), ३५१(२) व ६१(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला.

आरबीआयची नोटीस अन् ईडीचा लोगो
ममता यांना घाबरविण्यासाठी आरोपींनी त्यांना रिझर्व्ह बँकेकडून जारी झालेली तथाकथित नोटीस पाठविली. त्यात ममता यांचे नाव होते व आरबीआयचा लोगोदेखील होता. त्यामुळे त्या आणखी घाबरल्या. २४ जुलै रोजी ममता यांनी रक्कम जमा केल्यावर आरोपींनी एक पावती पाठविली. त्यात चक्क ईडीचा लोगो होता.

महिलेने चक्क काढले कर्ज
आरोपींकडून ममता यांना घाबरविण्यात येत होते. २५ जुलै रोजी त्यांना आरोपींनी सर्वोच्च न्यायालयाच्या नावाने नोटीस पाठविली व पाच लाख रुपये जमा करायला सांगितले. जवळचे सगळे पैसे संपल्याने ममता यांनी चक्क एफडीवर कर्ज काढले व ते पैसे आरोपींना पाठविले. आरोपींनी त्यांना परत ईडीचा लोगो असलेली पावती पाठविली.

असा उघडकीस आला प्रकार
आरोपींनी ममता यांचे पती विलास यांच्या बँक खात्याचे तपशीलदेखील मागविले. २९ जुलै रोजी विलास यांच्या पीपीएफ खात्यातून १० लाख रुपये काढून ते आरोपींना पाठविण्यात आले. त्याचे नोटीफिकेशन त्यांचा मुलगा प्रथमेशच्या मोबाइलवर गेले. त्यानंतर त्याने सर्व प्रकार जाणून घेतला व आपली फसवणूक झाल्याचे त्याने आईला सांगितले.

Web Title: 23 lakhs extorted from an old woman using the name of IPS Vishwas Nangre Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.