१५० कोटींच्या सुपारी तस्करीत २३ व्यापारी आले 'अडकित्त्यात'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2021 05:18 PM2021-10-11T17:18:57+5:302021-10-11T17:25:33+5:30
आयकर विभागाच्या मते १५० कोटी रुपये किमतीच्या सुपारीची तस्करी करून भारतात आणुन ३० कोटीच्या कराची चोरी करण्यात आली. जप्त केलेल्या १५० कोटी रुपयांच्या सुपारीचा मोठा भाग नागपूरला पोहोचला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुवाहाटी पोलिसांच्या हाती लागलेले सुपारी तस्करीचे रॅकेट १५० कोटींच्या गोलमालमध्ये अडकले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून या घोटाळ्याची सूचना मिळाल्यानंतर आसाम सीएमओच्या निर्देशानुसार पोलिसांनी कारवाई केल्याची माहिती आहे. या कारवाईनंतर उपराजधानीतील सुपारी व्यापाऱ्यात खळबळ उडाली आहे. गुवाहाटी वरून डीआरआय आणि जीएसटीची टीम नागपूरला आल्याचे समजताच सुपारीचे मोठे व्यापारी भूमिगत झाले आहेत.
‘लोकमत’ने वेळोवेळी उपराजधानीतून संचालित सुपारी तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा खुलासा केला होता. गुवाहाटी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी धाड टाकून आसाम, नागपूर रोड लाईन्सचे दिनानाथ मौर्या, विकास सिंह, संतोष सिंह आणि रमेश बेदला अटक केली आहे. नुकतेच घडलेले प्रकरण आश्चर्यचकित करणारे आहे.
सूत्रांनुसार तीन महिन्यापुर्वी गुवाहाटीत १५० कोटी रुपये किमतीच्या ६५ हजार सुपारीचे पोते जप्त करण्यात आले होते. आयकर विभागाच्या मते १५० कोटी रुपये किमतीच्या सुपारीची तस्करी करून भारतात आणुन ३० कोटीच्या कराची चोरी करण्यात आली. सुपारी जप्त करून गुवाहाटी येथील ट्रान्सपोर्टरच्या गोदामात ठेवण्यात आली होती. व्यापाऱ्यांनी सुपारी भारतीय असल्याचा दावा न्यायालयात करून सुपारी मुक्त करण्याची मागणी केली. न्यायालयाच्या निर्देशापूर्वीच व्यापाऱ्यांनी ट्रान्सपोर्टर सोबत हातमिळवणी करून सुपारी ताब्यात घेऊन विकून टाकली. त्याची कोणालाच माहिती झाली नाही.
काही दिवसांपूर्वी गुवाहाटीच्या प्रभावशाली व्यक्तींनी आसाम सीएमओला त्याची सोशल मिडियावर माहिती दिली. सीएमओने पोलिसांना कारवाईचे निर्देश दिल्यानंतर गुवाहाटीसह अनेक राज्यात धाड टाकून कोट्यवधी रुपयांची सुपारी जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या १५० कोटी रुपयांच्या सुपारीचा मोठा भाग नागपूरला पोहोचला आहे.
अटक केलेले दीनानाथ मौर्या शिवाय विजय, अनुप, रमेश, हरु, सोनु, राजेश, रवी, सुनील, जतीन, टिंकूचा जप्त केलेल्या सुपारीत हात असल्याचा संशय आहे. गुवाहाटी प्रकरणात २७ जणांना आरोपी केले आहे. परंतु केवळ चार जणांना अटक केली आहे. या कारवाईच्या वेळी बहुतांश आरोपी गुवाहाटीत उपस्थित होते. कारवाईची माहिती मिळताच ते रेल्वे आणि बसने सुरक्षित स्थळी रवाना झाले. त्यांच्या अटकेसाठी आणि सुपारी तस्करीची पाळेमुळे शोधण्यासाठी गुवाहाटीवरून डीआरआय, जीएसटीच्या १८ ते २० जणांची टीम नागपूरला पोहोचल्याची चर्चा आहे.
सुपारी बाजार थंडावला
सूत्रांनुसार केंद्रीय एजन्सीने त्यांना हव्या असलेल्या २३ सुपारी व्यापारी आणि ट्रान्सपोर्टरशी निगडित चार-पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यांच्या मालकांची माहिती मिळविण्यात येत आहे. त्याची माहिती मिळाल्यामुळे उपराजधानीतील सुपारी बाजार थंडावला आहे.