२,३०,७२७ विद्यार्थी, नागरिकांनी खालल्या हत्तीरोग प्रतिबंधक गोळ्या
By सुमेध वाघमार | Published: August 21, 2023 07:10 PM2023-08-21T19:10:35+5:302023-08-21T19:10:44+5:30
आतापर्यंत २,३०,७२७ विद्यार्थी व लोकांनी या गोळ्या घेतल्याची माहिती डॉ. मंजुषा मठपती यांनी दिली
नागपूर : महानगरपालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागाद्वारे शहरात राबविण्यात आलेल्या हत्तीरोग दुरीकरण मोहिमेने चार दिवसांतच मोठे लक्ष्य गाठले आहे. २,३०,७२७ विद्यार्थी व नागरिकांनी हत्तीरोग प्रतिबंधक गोळ्यांचे सेवन केले आहे.
हत्तीरोगामुळे शारीरिक विकृती, आजन्म अपंगत्व असे गंभीर परिणाम होतात. यामुळे हत्तीरोग नियंत्रणात येणे अतिशय आवश्यक आहे. पूर्वी या रोगावर ‘डायथिल कार्बामेझिन सायट्रेट’ व ‘अलबेंडाझॉल’ औषध दिले जायचे. परंतु आता ‘आयव्हरमेक्टिन’ या औषधांचाही समावेश करण्यात आला आहे. या ‘ट्रिपल ड्रग’ उपचार पद्धतीमुळे हत्तीरोग दुरीकरणाचे लक्ष्य गाठणे शक्य झाले आहे. नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या नेतृत्वात तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांच्या देखरेखीत हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ. मंजुषा मठपती यांच्या उपस्थितीत हत्तीरोग समूळ दुरीकरण मोहिमेचा शुभारंभ १७ आॅगस्ट रोजी झाला.
कार्यक्रमादरम्यान डॉ. बहिरवार यांनी स्वत: गोळ्या घेत मोहिमेविषयी जनजागृती केली. १७ ते १९ आॅगस्टपर्यंत बहुसंख्य शाळेत जाऊन गोळ्यांचे वाटप करण्यात आले. तर २० आॅगस्टपासून घराघरात आरोग्य पथक जाऊन गोळ्या खाऊ घालत आहेत. आतापर्यंत २,३०,७२७ विद्यार्थी व लोकांनी या गोळ्या घेतल्याची माहिती डॉ. मंजुषा मठपती यांनी दिली. ही मोहिम ३१ आॅगस्टपर्यंत चालणार आहे.