कारचे स्वप्न झाले भग्न, टोयोटाच्या मॅनेजरने हडपले २.३४ लाख; गुन्हा दाखल
By दयानंद पाईकराव | Published: June 24, 2024 03:09 PM2024-06-24T15:09:50+5:302024-06-24T15:09:59+5:30
गिट्टीखदानमध्ये गुन्हा दाखल : फायनान्स करून देण्याची बतावणी करून गंडविले
नागपूर : कारसाठी फायनान्स करून देण्याची बतावणी करून एका व्यक्तीला २.३४ लाखांनी गंडविल्याची घटना गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी टोयोटा कंपनीच्या व्यवस्थापकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
विवेक तेलखेडे (३५), मयुर घरडे (२७), मयंक केशव वानखेडे (४५, रा. राधा अपार्टमेंट, इंदुर, मध्यप्रदेश) आणि सय्यद मुस्तफा अल्लाबक्ष (५०, रा. आराधनानगर दिघोरी) अशी आरोपींची नावे आहेत. संदिप महादेव मेश्राम (४०, रा. हिमालय सनशाईन, गिट्टीखदान) यांना फायनान्सच्या माध्यमातून कार विकत घ्यायची होती. त्यांनी वाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील टोयोटा कंपनीच्या शो रुममध्ये शो रुमचे व्यवस्थापक आरोपी विवेक तेलखेडे व मयुर घरडेशी संपर्क साधला.
दोघांनी मेश्राम यांच्याकडून पॅनकार्ड, आधारकार्ड, बँक स्टेटमेंट व एपीआर असे कागदपत्र घेऊन पुणेवाला पिंगकॉक कंपनीमधून लोन मंजुर करून देण्याचे आश्वासन दिले. आरोपी मयंक वानखेडे याने आपण पिंगकॉक कंपनीत कार्यरत असल्याचे सांगून तुमचे ८ लाख २१ हजारांचे लोन मंजुर झाल्याची माहिती दिली. परंतु लोन मिळविण्यासाठी कंपनीच्या खात्यावर २ लाख ३४ हजार रुपये भरण्यास सांगितले. मेश्राम यांनी पेसे भरले असता ही रक्कम आरोपी सय्यद मुस्तफाच्या खात्यात जमा झाल्याने त्याने ही रक्कम आरोपी मयंक वानखेडेला दिली. ही रक्कम सर्व आरोपींनी हडपून मेश्राम यांना कोणतेही वाहन न देता त्यांची फसवणूक केली. मेश्राम यांनी दिलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम ४०६, ४२०, ३४ नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.