आठवड्याभरात २३६९ रुग्ण, ४९ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:07 AM2020-12-29T04:07:56+5:302020-12-29T04:07:56+5:30
नागपूर : मागील दोन आठवड्यामधील कोरोनाबाधितांची व मृतांची तुलना केली असता बाधितांची संख्या कमी झाली असून मृतांची संख्या कायम ...
नागपूर : मागील दोन आठवड्यामधील कोरोनाबाधितांची व मृतांची तुलना केली असता बाधितांची संख्या कमी झाली असून मृतांची संख्या कायम असल्याचे समोर आले. १३ ते १९ डिसेंबर या आठवड्यात २७०८ नवे रुग्ण व ४९ मृत्यू तर २० ते २६ डिसेंबर दरम्यान २३६९ रुग्ण व ४९ रुग्णांचे मृत्यू झाले. चाचण्या कमी झाल्याने रुग्णसंख्या कमी झाल्याचे बोलले जात आहे. रविवारी ३२६ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून १० रुग्णांचा जीव गेला. आतापर्यंत नोंद झालेल्या बाधितांची संख्या १२२३१४ तर मृतांची संख्या ३९००वर पोहचली आहे.
कोरोनाचा नवा स्ट्रेनबाबत सर्वत्र खबरदारीचे उपाय योजले जात असताना नागपूर जिल्ह्यात मात्र चाचण्यांची संख्या कमी होऊ लागली आहे. आज ३०३० चाचण्या झाल्या. यात २७५२ आरटीपीसीआर तर २७८ रॅपिड अँटिजेन चाचण्यांचा समावेश होता. अँटिजेन चाचणीतून १३, आरटीपीसीआर चाचणीतून ३१३ रुग्ण बाधित असल्याचे निष्पन्न झाले. बाधितांमध्ये शहरातील २४०, ग्रामीणमधील ८३ तर जिल्हा बाहेरील ३ रुग्णांचा समावेश आहे. मृतांमध्ये शहरातील ५, ग्रामीणमधील २ तर जिल्हाबाहेरील ३ मृत्यू आहेत. रविवारी २८५ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या ११४३५० झाली. सध्या ४०६४ रुग्ण उपचाराखाली असून १२९८ रुग्ण शासकीयसह खासगी रुग्णालयात दाखल आहेत.
-नागपूरचा मृत्यूदर ३.१८ टक्के
विदर्भात आतापर्यंत २४४४३६ बाधितांची नोंद झाली असून ६५०४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण २.६ टक्के आहे. महाराष्ट्राचा मृत्यूदर हा २.५ आहे.
तर नागपूर जिल्ह्यात रुग्णसंख्येच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण त्यापेक्षा जास्त, ३.१८ टक्के आहे.
-दुसऱ्यांदा आरोग्य अधिकारी पॉझिटिव्ह
महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी (रुग्णालय) डॉ. नरेंद्र बहिरवार रविवारी दुसऱ्यांदा कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले. यापूर्वी १० सप्टेंबर रोजी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. डॉ. बहिरवार यांच्यासोबत कार्यरत कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने त्याच्यापासून त्यांना संसर्ग झाला असावा असे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, तब्बल साडेतीन महिन्यानंतर पॉझिटिव्ह येण्याची अलिकडच्या काळातील हे पहिलेच प्रकरण असल्याचे, तज्ज्ञाचे म्हणणे आहे.
-दैनिक संशयित : ३०३०
-बाधित रुग्ण : १२२३१४
_-बरे झालेले : ११४३५०
- उपचार घेत असलेले रुग्ण : ४०६४
- मृत्यू : ३९००