कर्ज देण्याचा दावा अन् प्रोसेसिंग फीच्या नावाखाली व्यावसायिकाला २.३७ लाखांचा गंडा
By योगेश पांडे | Published: October 6, 2023 05:16 PM2023-10-06T17:16:24+5:302023-10-06T17:19:10+5:30
गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना
नागपूर : कर्ज देण्याचा दावा करून त्यानंतर प्रोसेसिग शुल्काच्या नावाखाली एका व्यावसायिकाला २.३७ लाखांचा गंडा घालण्यात आला. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
विकसा शरदराव वळणेकर (४७, साई स्कूल स्वामी कॉलेज, आकारनगर) यांची माईन ग्लोबल व्हेंचर नावाची कंपनी आहे. त्यांना व्यवसायासाठी कर्ज हवे होते. त्यामुळे त्यांनी ऑनलाईन काही पर्याय शोधले व त्यांनी अस्ट्रा फायनॅन्शिअल सर्व्हिस लिमीटेड या कंपनीसोबत संपर्क केला. त्यांनी त्यांची आवश्यक कागदपत्रेदेखील कंपनीला ई-मेलच्या माध्यमातून पाठविली होती. त्यानंतर दीपक सैनी नावाच्या व्यक्तीने त्यांना फोन केला व लवकरच कर्ज मिळेल असे आमिष दाखवत प्रोसेसिंग शुल्काच्या नावावर २.३७ लाख रुपये ऑनलाईन घेतले. मात्र त्यानंतर त्याने त्यांना कुठलेही कर्ज दिले नाही.
१२ जून ते १३ जुलै या कालावधीत हा प्रकार चालला. समोरून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर वळणेकर यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी संबंधित आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.