बसची २४ मिनिटांची तपासणी १० मिनिटांतच! वाहनांच्या ‘फिटनेस सर्टिफिकेट’वरच प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2022 08:15 AM2022-10-12T08:15:00+5:302022-10-12T08:15:05+5:30

Nagpur News बसला फिटनेस सर्टिफिकेट जारी करताना कमीतकमी २४ मिनिटे तपासणीला द्यावी, अशा सूचना परिवहन विभागाच्या असताना १० मिनिटांपेक्षाही कमी वेळेत तपासणी होत असल्याचे काही आरटीओ कार्यालयातील चित्र आहे.

24-minute bus inspection in 10 minutes! A question mark on the 'fitness certificate' of the vehicles itself | बसची २४ मिनिटांची तपासणी १० मिनिटांतच! वाहनांच्या ‘फिटनेस सर्टिफिकेट’वरच प्रश्नचिन्ह

बसची २४ मिनिटांची तपासणी १० मिनिटांतच! वाहनांच्या ‘फिटनेस सर्टिफिकेट’वरच प्रश्नचिन्ह

googlenewsNext

सुमेध वाघमारे

नागपूर : बसला फिटनेस सर्टिफिकेट जारी करताना कमीतकमी २४ मिनिटे तपासणीला द्यावी, अशा सूचना परिवहन विभागाच्या असताना १० मिनिटांपेक्षाही कमी वेळेत तपासणी होत असल्याचे काही आरटीओ कार्यालयातील चित्र आहे. परिणामी, नाशिकसारख्या घटना घडून प्रवाशांचे नाहक जीव जात आहेत.

नाशिक येथे खासगी बस आणि टँकरच्या अपघातानंतर लागलेल्या आगीत बसमधील १२ जणांचा होरपळून मृत्यू झाला. प्राथमिक चौकशीत बसला फिटनेस सर्टिफिकेट देण्यात आले असलेतरी आपत्कालीन दरवाजा उघडत नसल्याचे पुढे आले. यामुळे वाहनांना दिले जाणारे ‘फिटनेस सर्टिफिकेट’ म्हणजे ‘योग्यता प्रमाणपत्रा’वरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. विशेष म्हणजे, नियमावलीनुसार वाहनांची तपासणी केल्याशिवाय त्यांना ‘फिटनेस सर्टिफिकेट’ देऊ नका, असे न्यायालयाने राज्य सरकारला बजावले आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन आयुक्त कार्यालयाने २४ ऑगस्ट २०१२ रोजी फिटनेस सर्टिफिकेट देताना तपासणी कामामध्ये गुणात्मक वाढ करण्यासाठी समिती गठित केली. समितीच्या शिफारशीत वाहनाच्या रंगापासून ते आपत्कालीन दरवाजा तपासणीच्या सूचना करण्यात आल्या. एवढेच नव्हे तर प्रत्येक वाहन तपासणीसाठी वेळही निर्धारित केली आहे, असे असतानाही नाशिकसारख्या घटना घडतच आहेत.

- वाहनांतील या तपासणीचे निर्देश

या समितीच्या शिफारसीनुसार, वायुप्रदूषण चाचणी, हेड लाइट चाचणी, व्हील अलायमेंट चाचणीचे प्रमाणपत्र तपासण्यापासून ते वाहनांची बांधणी, टायरची स्थिती, ब्रेक, स्टेअरिंग, सेफ्टी ग्लास, विंडस्क्रीन वायपर, सिग्नलिंग डिव्हायसेस, डायरेक्शन इंडिकेटर व स्टॉप लाइट, इंडिकेटरची स्थिती, रिफ्लेक्टर, दिवे, वायुप्रदूषण, हॉर्न, वाहनांचा रंग, चेसीस फ्रेमची स्थिती, आरसा, लीफस्प्रिंग, मडगार्ड, आसन व्यवस्था, अग्निशामक उपकरण, आपत्कालीन दरवाजा, प्रथमोपचारपेटी, स्पेअर व्हील व टुलसेट आदींची तपासणी करण्यासोबतच प्रत्यक्ष चाचणीमध्ये ब्रेकिंग सिस्टीम, स्टेअरिंग सिस्टीम, इलेक्ट्रिल सिस्टीम, सस्पेशन सिस्टीम, इंजिन ट्रान्समिशन सिस्टीमची तपासणी करण्याचे निर्देश आहेत.

-ऑटोरिक्षा तपासणीला १०, तर बसला २४ मिनिटे

फिटनेस सर्टिफिकेट देत असताना प्रत्येक वाहन तपासणीसाठी लागणारा वेळही समितीने निर्धारित केला आहे. यात ऑटोरिक्षाला १० मिनिटे, कारला १५, ट्रकला १९, तर बसला २४ मिनिटांचा वेळ दिला आहे. यातही किती मिनिटांत कोणत्या गोष्टी तपासाव्यात याचेही निर्देश आहेत.

-किती मिनिटांत, कोणती तपासणी

: तपासणीचा प्रकार : जड प्रवासी वाहन (बस)

: चेसीस क्र. इंजिन क्र. : ३ मिनिटे

:हेडलॅम्प, ब्रेकलॅम्प, टेललॅम्प, वायपर्स, हॉर्न, रिफलेक्टर, टायर्स, लिफस्प्रिंग, वाहनांचा रंग, : ६ मिनिटे

: प्रत्यक्ष वाहन चालवून ब्रेकची कार्यक्षमता व स्टेअरिंगमधील प्ले व वाहन यांत्रिकदृष्ट्या सुस्थितीत असल्याची खात्री : १० मिनिटे

: आसन व्यवस्था, आपत्कालीन दरवाजा, अग्निशमन उपकरणे, प्रथमोपचारपेटी व स्कूल बसेस नियमावलीची पूर्तता : ५ मिनिटे

Web Title: 24-minute bus inspection in 10 minutes! A question mark on the 'fitness certificate' of the vehicles itself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.