विदर्भात २४ नव्या रुग्णांची नोंद; कोरोना रुग्ण संख्येने ४०० चा टप्पा ओलांडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 09:09 AM2020-05-05T09:09:23+5:302020-05-05T09:09:59+5:30
विदर्भात रविवारी दिवसभरात २४ नव्या कोरोनाबाधितरुग्णांची नोंद झाली. यात अकोल्यात पुन्हा नऊ रुग्ण आढळून आले. शिवाय, अमरावतीत पाच, नागपुरात ९ तर यवतमाळमध्ये एक रुग्णाची नोंद झाली आहे. विदर्भातील कोरोनाबाधितांच्या संख्येने आता ४०० चा टप्पा ओलांडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भात कोरोनाबाधित रुग्णांचा वेग मंदावला आहे. रविवारी दिवसभरात २४ नव्या रुग्णांची नोंद झाली. यात अकोल्यात पुन्हा नऊ रुग्ण आढळून आले. शिवाय, अमरावतीत पाच, नागपुरात ९ तर यवतमाळमध्ये एक रुग्णाची नोंद झाली आहे. विदर्भातील कोरोनाबाधितांच्या संख्येने आता ४०० चा टप्पा ओलांडला आहे. रुग्णसंख्या ४०५ झाली आहे.
राज्यात कोरोनाचा प्रभाव असलेले कंटेनमेंट झोन वगळता जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंची सर्व एकल दुकाने सोमवारी सुरू करण्यात आली. यामुळे सामान्यांची रस्त्यावर तुरळक गर्दी दिसून आली असलीतरी कोरोनाविषयक भिती कायम होती. विदर्भात आज पुन्हा नवे रुग्ण आढळून आले. यात नागपुरात नऊ रुग्णांची नोंद झाली. येथील रुग्णांची संख्या १६० वर गेली असून दोन मृत्यू आहेत. बरे झालेल्यांची संख्या ५० आहे. अकोला जिल्ह्यात नऊ रुग्णांची नोंद झाली. रुग्णांची संख्या ६४ वर पोहचली आहे. यातील १३ रुग्ण बरे झाले आहेत. सहा मृत्यू आणि एका कोरोनाबाधित रुग्णाची आत्महत्या आहे. अमरावतीमध्ये आज पाच रुग्णांचे निदान झाले. रुग्णांची संख्या ६६वर गेली आहे. यातील पाच कोरोनामुक्त झाले असून मृत्यूची संख्या १० आहे. विशेष म्हणजे, अमरावती विद्यापीठाच्या प्रयोगशाळेतून आजपासून कोरोना चाचणीला सुरूवात झाली आहे. यामुळे नमुन्यांचा अहवाल तातडीने मिळून रुग्ण उपचाराखाली येणार आहेत. यवतमाळ जिल्ह्यात एक रुग्णाची नोंद झाली. येथील रुग्णसंख्या ९३वर पोहचली असून १२ रुग्ण बरे झाले आहेत. बुलढाणा जिल्ह्यात रुग्णांची संख्या २४वर स्थिरावली आहे. यातील आज एक रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे. बरे झालेल्यांची संख्या २० आहे. आता केवळ तीन रुग्ण उपचारखाली आहेत. हे तिन्ही कामठी येथील आहेत. भंडारा, वाशिम, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत प्रत्येकी एकच रुग्ण आढळून आला आहे.