६० दिवसांत २४ रुग्ण
By admin | Published: March 27, 2017 02:22 AM2017-03-27T02:22:11+5:302017-03-27T02:22:11+5:30
उन वाढत असतानाही स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून येत आहे. गेल्या ६० दिवसांत पूर्व विदर्भात स्वाईन फ्लूच्या २४ रुग्णांची नोंद झाली आहे.
स्वाईन फ्लूने आणखी एका महिलेचा बळी : टॅमिफ्लू सिरपचा तुटवडा
नागपूर : उन वाढत असतानाही स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून येत आहे. गेल्या ६० दिवसांत पूर्व विदर्भात स्वाईन फ्लूच्या २४ रुग्णांची नोंद झाली आहे. यातच चार रुग्णांचा मृत्यूने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सर्वच शासकीय रुग्णालयांमध्ये टॅमिफ्लू गोळ्यांचा साठा असलातरी लहान मुलांना दिले जाणारे ‘टॅमिफ्लू सिरप’चा तुटवडा पडला आहे. याला गंभीरतेने घेत आरोग्य उपसंचालकांनी स्थानिक पातळीवर‘सिरप’ खरेदी करण्याचे निर्देश दिले आहेत.
शंकरनगरातील एका खासगी रुग्णालयात चार स्वाईन फ्लूचे रुग्ण भरती होते. त्यापैकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला, तर दोन रुग्णांवर उपचार करून सुटी देण्यात आली. रामदासपेठ येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका महिलेचा गेल्या आठवड्यात मृत्यू झाला.
विशेष म्हणजे, दोन आठवड्यात स्वाईन फ्लूचे चार रुग्णांचे बळी घेतले आहे. स्वाईन फ्लूवर उपसंचालक, आरोग्य विभाग कार्यालय लक्ष ठेवून आहे. नुकत्याच झालेल्या एका बैठकीत स्वाईन फ्लूवरील औषधांचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार, शहरात आरोग्य विभागाकडे ३० ग्रॅम टॅमिफ्लूच्या १५ हजार गोळ्या, ४५ ग्रॅम टॅमिफ्लूच्या सात हजार गोळ्या तर ७५ ग्रॅम टॅमिफ्लूच्या ८० हजार गोळ्या उपलब्ध आहेत. प्रत्येक जिल्ह्यात स्वाईन फ्लूवरील उपचाराची सोय करून देण्यात आली आहे. आतापर्यंत २४ रुग्णांची नोंद झाली असून सहा रुग्ण खासगी इस्पितळात उपचार घेत आहेत.(प्रतिनिधी)
स्थानिक पातळीवर ‘सिरप’ खरेदी
उन्हाळ्याच्या तोंडावर स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून येत आहे. यामुळे सर्वच इस्पितळांना सावधगिरीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रुग्णालयांमध्ये टॅमिफ्लू गोळ्यांची स्थिती समाधानकारक आहे. परंतु ‘टॅमिफ्लू सिरप’चा तुटवडा आहे. यावर सर्व रुग्णालयांना स्थानिक पातळीवर हे सिरप खरेदी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
-डॉ. संजय जयस्वाल
उपसंचालक, आरोग्य विभाग