बुटीबोरीत महाआरोग्य तपासणी शिबिर २४ रोजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 11:32 PM2018-03-21T23:32:37+5:302018-03-21T23:32:54+5:30
समाजातील गरीब, वंचित घटकांच्या कल्याणाची बांधिलकी जोपासण्याचा एक भाग म्हणून जैन सहेली मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शनिवार २४ मार्च रोजी नि:शुल्क महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : समाजातील गरीब, वंचित घटकांच्या कल्याणाची बांधिलकी जोपासण्याचा एक भाग म्हणून जैन सहेली मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शनिवार २४ मार्च रोजी नि:शुल्क महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीमती ज्योत्स्ना दर्डा मेमोरियल वूमन डेव्हलपमेंट अॅन्ड वेल्फेअर सेंटर ६, जैन सहेली मंडळ, पी-६०, आर अॅन्ड सी झोन, इरा इंटरनॅशनल शाळेजवळ, एमआयडीसी इंडस्ट्रीयल परिसर, बुटीबोरी येथे सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत आयोजन करण्यात आले आहे.
लोकमत व जैन सहेली मंडळ, नागपूरद्वारा आयोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) व शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या सहकार्याने होणारे हे शिबिर सर्वांसाठी नि:शुल्क आहे. शिबिराचे उद्घाटन लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा, आमदार समीर मेघे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. सिंधू गणवीर, बुटीबोरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक हेमंत चांदेवार, सरपंच वंदना ठाकरे व जैन सहेली मंडळाच्या अध्यक्षा माधुरी बोरा यांच्या उपस्थितीत होईल.
जैन सहेली मंडळातर्फे समाजातील महिलांच्या प्रगतीसाठी वर्षभर सातत्याने निरनिराळ्या विधायक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. महिलांना स्वावलंबी करण्यासाठी जैन सहेली मंडळातर्फे निरनिराळ्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतात. महिला व बालकांच्या सक्षमीकरणाचाच एक भाग म्हणून या भव्य नि:शुल्क आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या आरोग्य शिबिरात शासकीय दंत रुग्णालयाची चमू दंत विकाराची तपासणी करतील. यासाठी विशेष ‘डेंटल व्हॅन’ उपलब्ध असणार आहे. मेडिकल रुग्णालयाकडून नेत्र तपासणी, चष्म्याचे नंबर काढण्यापासून ते डोळ्यांचे आजार, हाडांचे आजार, बालकांचे आजार, कान-नाक-घशाचे आजार, महिलांचे आजार, त्वचेचे आजार, श्वसन व दम्याचे आजार, ग्रंथीचे विकार आदी तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासले जातील. शिबिरात विविध कर्करोग, सामान्य शस्त्रक्रिया व प्लास्टिक सर्जरीचे तज्ज्ञ सहभागी होणार असल्याने या आजाराशी संबंधित रुग्णांची तपासणी व मार्गदर्शन केले जाईल.