२४ वर्षाच्या युवा संशोधकाने शोधली 'वेदर अलर्ट सिस्टिम'; ऊन, वारा, पावसाचे क्षणाेक्षणी अपडेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2022 07:00 AM2022-01-19T07:00:00+5:302022-01-19T07:00:08+5:30
२४ वर्षाच्या आयआयटी स्काॅलर युवा संशाेधकाने अशी एक सिस्टीम तयार केली आहे, ज्यात क्षणाेक्षणी घडणाऱ्या हवामान बदलाचे अपडेट मिळतील आणि अलर्ट देणारी माहितीही !
निशांत वानखेडे
नागपूर : २४ वर्षाच्या आयआयटी स्काॅलर युवा संशाेधकाने अशी एक सिस्टीम तयार केली आहे, ज्यात क्षणाेक्षणी घडणाऱ्या हवामान बदलाचे अपडेट मिळतील आणि अलर्ट देणारी माहितीही ! विशेष म्हणजे त्याच्या संशोधनाला ऑस्ट्रेलियन सरकारकडून पेटंटही मिळाले आहे. उन, वारा, पावसाचे कोणत्याही गावातील क्षणोक्षणी अपडेट्स मिळवणारे त्याचे हे संशोधन गावखेड्यांसाठी महत्वाचे ठरणार आहे.
सध्या हवामानाचा अंदाज रडार, साेनार आणि उपग्रहाद्वारे काढला जाताे. मात्र, या नव्या सिस्टीममध्ये याची गरज नाही. हे डिव्हाईस आपल्याला शहरातील टेलिकाम टाॅवरवर फिट करता येईल. टाॅवरच्या जीपीएस प्रणालीद्वारे हे चालेल. एका सिस्टीममध्ये सहा संयत्र जाेडता येईल आणि यासाठी केवळ ८ ते १० हजार रुपये खर्च येईल. सिस्टीमद्वारे तुमच्या माेबाईलवर मॅसेज जाईल. यासाठी ॲन्ड्राईड माेबाईलची गरज नाही, साध्या जीएसएम माेबाईलवरही ताे मॅसेज जाऊ शकेल. प्राध्यापकांच्या मार्गदर्शनात पुणे, बंगळुरू व लंडनमध्ये जाऊन त्यांनी दाेन वर्ष अभ्यास केल्यावर हे संशोधन जाहीर केले. या प्रयाेगाला ‘आयईईई’चा २०१५-१६ चा बेस्ट पेपर अवाॅर्ड प्राप्त झाला आहे.
अशी आहेत वैशिष्ट्ये
- अमेरिकेच्या ‘रास्पबेरी पाय’, ‘बीगल बाेन ब्लॅक’ आणि इटलीच्या ‘आर-ड्युनाे’ मायक्राे काॅम्प्युटर तंत्राचा आधारावर सिस्टिम तयार
- ‘हायब्रीड हेक्जॅगाेनल एनर्जी एफिशियंट’ (एच-२ ई-२) प्रमाणे विकसित. आसपासच्या वस्त्यांमध्ये हवामानात हाेणाऱ्या बदलाची अचूक माहिती मिळेल.
- डिव्हाईस बॅटरीवर आधारित असेल व किमान वर्षभर सेवारत.
- सिस्टीममधील अपडेट, दुरुस्ती अगदी रिमाेट सेन्सिंगद्वारे घरी बसून किंवा आर-पार तंत्रज्ञानाने परदेशातूनही करता येईल.
- यावरून ट्रॅफिक जामचेही अपडेटही घेता येईल. यासाठी केवळ सेन्सर कॅमेरा लावून सिस्टीममध्ये थाेडे बदल करावे लागेल.
शेतीसाठी फायदेशीर
अचानक येणाऱ्या पावसामुळे किंवा हवामानाच्या इतर बदलामुळे पुढे हाेणारे नुकसान पूर्वसूचनेमुळे टाळता येईल. सिस्टीम आलार्मप्रमाणे अलर्ट देईल. पिकाची नासधूस करणाऱ्या जनावरांच्या हल्ल्याची माहितीही सिस्टीमद्वारे मिळेल, असा दावा वरद यांनी केला.
काेण आहे वरद?
वरद विश्वरूपे यांनी नागपुरातून बारावी केल्यानंतर एमआयटी पुणे येथून आयआयटी केले. सध्या ते अमेझॉन रिसर्च इंडिया येथे डेटा सायंटिस्ट म्हणून कार्यरत आहेत. जागतिक पातळीवर त्यांचे एकूण १८ पेपर प्रकाशित झाले आहेत. चार पेटंटही त्यांच्या नावावर आहेत. त्यांचे वडील डाॅ. विवेक विश्वरुपे यवतमाळच्या अमाेलकचंद महाविद्यालयात प्राध्यापक आहेत.